25 April 2019

News Flash

चालक मद्यपी असेल तर गाडी सुरू होणे अशक्य

नाशिकच्या अजिंक्य जाधवच्या संशोधनाची अमेरिकेत दखल

|| चारुशीला कुलकर्णी

नाशिकच्या अजिंक्य जाधवच्या संशोधनाची अमेरिकेत दखल

मद्यप्राशन करून वाहन चालविणे अनेकदा अपघाताचे कारण ठरते. त्यात मद्यपी चालकासह निष्पापांचा बळी गेल्याची असंख्य उदाहरणे आहेत. हे केवळ भारतातच घडते असे नव्हे, तर प्रगत अमेरिकेसह जगाच्या पाठीवरील अनेक देशांत मद्यपी चालकांमुळे अपघात घडतात. स्थानिक पातळीवर पोलीस कधीतरी ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’च्या कारवाईद्वारे अशा चालकांना अटकाव करण्याचा प्रयत्न करतात. ते प्रयत्न तोकडे पडतात. या पाश्र्वभूमीवर मद्यपान करून कोणी गाडी चालविण्याचा प्रयत्न केल्यास ती जागची हलणार नाही, असे अनोखे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. सध्या अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मूळच्या नाशिक येथील अजिंक्य जाधवच्या संशोधनाची दखल अमेरिकन सरकारने घेऊन त्याला सन्मानित केले आहे.

आजची युवा पिढी कट्टय़ावर, वाहने सुसाट चालविण्यास अथवा भ्रमणध्वनीवर खेळ, समाजमाध्यमात अधिक सक्रिय असल्याची तक्रार केली जाते.  हे चित्र बदलण्यासाठी जगातील काही समविचारी युवक एकत्र आले. त्या त्या भागात भेडसावणाऱ्या स्थानिक प्रश्नांवर त्यांच्या पातळीवर ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. युवकांच्या याच गटात १९ वर्षांचा अजिंक्यही सहभागी झाला आहे. हॉवर्ड विद्यापीठात विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अजिंक्यने वेगळी वाट धुंडाळली. विद्यापीठात शिकत असताना त्याने शिष्यवृत्ती मिळवली. यंगस्टाउन विद्यापीठात त्याने संशोधनाला सुरुवात केली. सामाजिक प्रश्नांवर काम करू इच्छिणारी समविचारी मंडळी जमवली. जगभरातील वेगवेगळ्या देशांतील २५० हून अधिक युवकांना एकत्र घेत त्याने ‘वी ऑल टीन’ ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करीत आहे.

समविचारी मंडळी एकत्र असल्याने एकाच प्रश्नावर वेगवेगळ्या पद्धतीने विचार होतो, याकडे अजिंक्यने लक्ष वेधले. मद्यपी चालकांमुळे होणारे अपघात, हा तसा जागतिक प्रश्न. अमेरिकेतील ओहयो राज्यात ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ची प्रकरणे मोठय़ा प्रमाणावर घडतात. त्यात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. यावर उपाय शोधण्याच्या दृष्टिकोनातून विचार सुरू झाला. त्यातून एक तंत्रज्ञान विकसित झाले.

मद्यपानानंतर शरीरात अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्यास मोटार चालणार नाही, असे हे तंत्रज्ञान आहे. चारचाकी वाहनात हे तंत्रज्ञान उपयोगात आणल्यास अपघातांचे प्रमाणही कमी करता येईल. कारण, मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीने गाडीचे ‘स्टीअरिंग’ हाती घेतल्यास संबंधिताच्या शरीरात अल्कोहोलचे प्रमाण किती आहे, याची चाचपणी होईल. हाताला येणाऱ्या घामातून ही प्रक्रिया आपोआप पार पडेल. शरीरात ६० टक्के किंवा त्याहून अधिक अल्कोहोल असल्यास ‘इग्नोशियनजवळ हे समजेल. यामुळे गाडी चालणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजे जादा मद्यपान करून चालक मोटार चालवू शकणार नाही. एकतर त्याला आपली मोटार चालवण्यासाठी मद्यपान न केलेल्या अन्य चालकाची मदत घ्यावी लागेल अथवा आपली गाडी आहे तिथेच ठेवून अन्य मोटारीचा पर्याय निवडावा लागेल. जेणेकरून रस्त्यावरील अपघातांना पायबंद घालता येईल.

या विलक्षण तंत्रज्ञानास अमेरिकन सरकारने दाद दिली आहे. अजिंक्यला वॉशिंग्टन डीसी येथे ‘एशियन एमरजिंग युथ इन यू एस’ पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. तसेच अजिंक्यच्या संस्थेची वाटचाल पाहता २०१९ च्या ‘फोरबर्स’ ३० च्या खालील यादीत त्याचे नामांकन करण्यात आले आहे.

संशोधनाचे वेगळेपण

  • मोटारीचे ‘स्टीअरिंग’ हातात घेतल्यावर अल्कोहोल तपासणी
  • ६० टक्के किंवा अधिक अल्कोहोल आढळल्यास मोटार बंद
  • याबाबत सेन्सरद्वारे माहिती दिली जाईल
  • अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्यास वाहन बंद राहील अशी चारचाकी वाहनात व्यवस्था करण्यात आली आहे.

First Published on February 5, 2019 1:21 am

Web Title: new technology in car