नवीन वर्षांचे स्वागत करताना मद्यपान करुन धूम स्टाईलने वाहने चालविणे, दुचाकींवर क्षमतेहून अधिक वाहतूक करणे आणि डीजे लावून धिंगाणा घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री प्रमुख मार्गावर स्थानिक पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखा यांचे अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत. ठिकठिकाणी संरक्षक जाळ्या लावून वाहनधारकांची तपासणी केली जाईल. चालकाने मद्यसेवन केले आहे की नाही, हे तपासण्यासाठी पोलीस यंत्रणेकडे १३ ‘ब्रेथ अ‍ॅनलायझर’ यंत्रे उपलब्ध आहेत. त्याआधारे कारवाई केली जाणार आहे.

शहरातील कॉलेजरोड हा युवकांसाठी आवडता रस्ता. महत्त्वाच्या घडामोडींवेळी तरुणांकडून या रस्त्यावर जल्लोष केला जातो. मोटारसायकल, चारचाकी अशा वाहनांद्वारे युवकांचे जत्थे परिसरात धांडडधिंगा करतात. या रस्त्यावरील नेहमीचा गोंधळ स्थानिकांसाठी तापदायक ठरतो. कॉलेज रोड, गंगापूरसह अशी जी ठिकाणे आहेत, तिथे अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीने पोलीस यंत्रणा शहरातील प्रमुख रस्त्यांवर लोखंडी अडथळे उभारून वाहन तपासणीची मोहीम राबवून मद्यपींवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. या दिवशी कोणी धागडधिंगा, मद्यप्राशन करून वाहने दामटणे, क्षमतेहून अधिक वाहतूक करणे असे प्रकार केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बजावले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार डिजेला बंदी आहे. गणेशोत्सवात पोलिसांनी या संदर्भात जनजागृती केली होती. डीजे वाजविणाऱ्या मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचा ताजा इतिहास आहे. नववर्षांचे स्वागत करताना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी कोणी डीजेचा वापर केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.