नाशिकच्या ओझर विमानतळावर ‘नाइट लँडिंग’ परवानगीचा फायदा

नाशिक : प्रवासी विमानांना रात्रीच्या वेळी ओझर विमानतळाचा वापर करण्यास (नाइट लँडिंग) नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने परवानगी दिल्यामुळे नाशिकच्या विमानसेवेला चालना मिळणार आहे. उडान योजनेंतर्गत सध्या ओझर विमानतळावरून केवळ हैद्राबाद आणि अहमदाबादसाठी सेवा उपलब्ध आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभलेली जेटची नाशिक-दिल्ली सेवा बंद पडली. लवकरच अन्य कंपनीमार्फत ती सुरू होईल. सायंकाळनंतर विमान उड्डाण आणि उतरण्यातील अडसर दूर झाल्याने नाशिकहून गोवा, बेंगळुरू, भोपाळ आदी प्रस्तावित सेवांचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या घडामोडीत ओझरला शिर्डी विमानतळाशी स्पर्धा करावी लागत आहे.

राजकीयदृष्टय़ा प्रभावशाली नगर जिल्ह्य़ात शिर्डी विमानतळ कार्यान्वित झाले आणि नाशिकच्या ओझर विमानतळाचे महत्त्व कमी झाले. देशभरातून शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. त्यांना विमानाने थेट शिर्डी गाठण्याचा पर्याय उपलब्ध झाला. अल्पावधीत शिर्डी देशाच्या अनेक भागांशी हवाई मार्गाने जोडले गेले. तसे नाशिकबाबत घडले नाही. येथेही धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या कमी नाही. देशभरातील वाइनचा चाहता नाशिककडे आकर्षित होत आहे. औद्योगिक आणि कृषी क्षेत्रास विमान सेवेची निकड आहे. तरीदेखील हवाई नकाशावर नाशिकचे अस्तित्व टिकविण्यात बरीच वर्षे गेली. काही वर्षांत नाशिकहून किती वेळा विमान सेवा सुरू झाली अन् किती वेळा बंद पडली, याचे उत्तर सहजपणे कोणाला देता येणार नाही. प्रारंभीच्या काळात जादा प्रवासी क्षमतेच्या विमानांना प्रतिसाद नव्हता. नंतर जमीन-पाण्यावर उतरण्याची क्षमता राखणाऱ्या छोटेखानी ‘सी प्लेन’चा प्रयोग झाला. तोदेखील अपयशी ठरला. कधी मुंबई विमानतळावर विमान उतरण्यास वेळ मिळाला नाही, तर कधी खासगी कंपनीकडे वैमानिक नसल्याने काही सेवा गुंडाळल्या गेल्या. उडान योजनेंतर्गत नाशिकहून विमानाने पुन्हा भरारी घेतली. सध्या नाशिक-हैद्राबाद, नाशिक-अहमदाबाद अशा दोन सेवा सुरू आहेत. जेट एअरवेजची नाशिक-दिल्ली सेवा बंद पडली. पुढील काही महिन्यात अन्य कंपनी ती सुरू करत आहे. नाशिकहून गोवा, बेंगळुरू, भोपाळ आदी ठिकाणी विमान सेवा प्रस्तावित आहे. ओझर विमानतळाचा रात्रीदेखील वापर करण्यास मान्यता मिळाल्याने विमान कंपन्यांना नवीन सेवा सुरू करण्याचे नियोजन करता येईल.

लढाऊ विमानांची बांधणी करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) अखत्यारीत ओझर विमानतळ आहे. लढाऊ विमानांच्या चाचणीसाठी त्याचा मुख्यत्वे वापर केला जातो. अंधारात विमानास धावपट्टीवर उतरण्यासाठी लागणारी यंत्रणा आधीपासून अस्तित्वात आहे. केवळ प्रवासी विमानांना रात्री धावपट्टी वापराची परवानगी नसल्याने कंपन्यांना सेवांचे नियोजन करणे अवघड बनले होते. हा अडसर संपुष्टात आला आहे. शिर्डी विमानतळावर सद्यस्थितीत विमानांना रात्री उड्डाण आणि उतरण्याची व्यवस्था नाही. तिथे त्या व्यवस्थेचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगितले जाते. पुढील काही महिन्यांत तिथे ही व्यवस्था उपलब्ध होईल. शिर्डी आणि ओझर विमानतळात फरक आहे. शिर्डी विमानतळाचे संचलन महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणामार्फत केले जाते. ओझर विमानतळ एचएएल संचलित करते. शिर्डी विमानतळ पूर्णत: नागरी वाहतुकीसाठी वापरले जाते. ओझर विमानतळाचा लष्करी-नागरी संयुक्त वापर होतो. ओझर विमानतळाची धावपट्टी मोठी आहे. आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. परंतु, शिर्डीच्या तुलनेत दररोजची उड्डाणे मात्र अल्प आहेत. रात्री मुंबई विमानतळावर विमाने उभी करण्यास पुरेशी जागा नसते. तेथील विमाने ओझर विमानतळावर आणण्याचा जुना प्रस्ताव आहे. या परवानगीने तो विषय मार्गी लागू शकेल. पुण्यातील लोहगाव विमानतळावर बरीच वर्षे ओझरप्रमाणे रात्रीचे निर्बंध होते. तेथील विमानतळ रात्रीच्या वेळी प्रवासी विमानांना खुले झाल्यानंतर हवाई सेवेला विलक्षण गती मिळाली. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी, निर्यातदार ती अपेक्षा बाळगून आहेत.

नाशिक-गोवा विमानसेवा सुरू करण्याची तयारी स्पाइस जेट कंपनीने दर्शविली. याशिवाय नाशिकहून बेंगळुरू, भोपाळ आदी शहरांमध्ये सेवा प्रस्तावित आहे. ओझर विमानतळावर रात्री विमानांना उतरण्यास परवानगी मिळाल्याने उपरोक्त सेवांसह कंपन्यांना नवीन सेवांचा विचार करता येईल.

– हेमंत गोडसे, खासदार, नाशिक