नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) यांच्यातर्फे २७ ते ३० मे या कालावधीत आयोजित ‘निमा पॉवर २०१६’ या इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. ‘इलेक्ट्रोफाइंग दी फ्युचर’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनातील स्टॉल नोंदणीला लघू, मध्यम व मोठय़ा उद्योगांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्र्यंबक रस्त्यावरील ठक्कर्स डोम येथे हे प्रदर्शन होणार आहे. यंदा प्रदर्शनात अधिकाधिक इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांना प्रदर्शनात वाव देण्यात आला आहे. तसेच स्टॉलची उभारणी वैशिष्टय़पूर्ण पद्धतीने करण्यात आली आहे. नाशिकसह महाराष्ट्र आणि परराज्यातील उद्योजक प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. गेल्या काही वर्षांत वाहन उद्योगांचे केंद्र बनलेल्या नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल उद्योगांचे केंद्र बनण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरू असले तरी त्यास उद्योगांकडून तसाच प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कार्यरत उद्योगांची संख्या मोठी आहे. ‘सर्किट ब्रेकर’ निर्मिती करणारे बडे उद्योगही येथे आहेत. या सर्व बाबी नाशिकच्या या क्षेत्राच्या विकासाला चालना देणाऱ्या आहेत. प्रदर्शनाच्या माध्यमातून या क्षेत्रातील उत्पादन, मोठय़ा उद्योगांना लागणारी सामग्री, संशोधन या विषयावर सर्वागीण प्रकाशझोत पडणार आहे. प्रदर्शनांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रकल्प सादरीकरणाची संधी, विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रदर्शनाचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी दिली. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजकत्व टीडीके इप्कॉसने तर सुवर्ण प्रायोजकत्व एबीबी इंडिया लिमिटेडने स्वीकारले आहे. तसेच रुपेरी प्रायोजकत्व हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्यासह मंत्राज् ग्रीन रिसोर्सेस, शिवनंदा इलेक्ट्रॉनिक्स यांनी स्वीकारले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन २७ मे रोजी होणार आहे. या प्रसंगी उद्योजक, व्यावसायिक आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेश पाटणकर आदींनी केले आहे.