News Flash

ऐन गणेशोत्सवात नऊ गावठी पिस्तुलांसह ३९ काडतुसे हस्तगत

अनेक तलवारी, कोयते, चॉपर जप्त

नाशिक पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेला शस्त्रसाठा.

अनेक तलवारी, कोयते, चॉपर जप्त

ऐन गणेशोत्सवाच्या काळात शहरात वेगवेगळ्या मोहिमांमध्ये पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. पंचवटीतील हनुमानवाडी येथे गावठी पिस्तुल विकण्यासाठी आलेल्या तीन संशयितांकडून सहा कट्टे आणि नऊ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. गावठी कट्टय़ांचा पुरवठादार हा मूळचा जळगावचा असल्याचे तपासात पुढे आले आहे. दुसऱ्या घटनेत दोन संशयितांकडून दोन तलवारी, लहान-मोठे सहा कोयते, चार चॉपर आणि चाकू अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. खंडणीसाठी धमकाविणाऱ्या दोन संशयितांकडून दोन पिस्तुल आणि ३० जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

या कारवाईची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही वर्षांत शहरात अवैध पिस्तुल बाळगण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यात गुन्हेगारी मंडळींसह महाविद्यालयीन युवक व इतर घटकांचा समावेश आहे. अवैध शस्त्रांच्या शोध मोहिमेत जानेवारीपासून आतापर्यंत ३१ पिस्तुल पोलिसांनी जप्त केले होते. अवैध शस्त्रांचा वाढता वापर ही गंभीर बाब असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी ही शस्त्र कशा पध्दतीने शहरात पोहोचतात, याचा माग काढण्यास सुरूवात केली. त्याच दरम्यान पंचवटी पोलिसांना काही संशयित गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमानवाडी येथील ड्रिम कॅसल परिसरात सापळा रचण्यात आला. रात्री पावणे दहाच्या सुमारास शक्तीसिंह कालुसिंग, राजपूत (२६, गणदीप सोसायटी, पाथर्डी फाटा), संतोष विलास अल्हाट (२३, श्रीराज सहनिवासी सोसायटी, सिडको), सुनील विष्णू नाथभजन (२५, संतोषी मातानगर, सातपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सहा कट्टे आणि नऊ जिवंत काडतुसे असा सव्वा लाख रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. शक्तीसिंह राजपूत हा मूळचा जळगावच्या चोपडा येथे राहणारा संशयित गावठी कट्टय़ांचा पुरवठादार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सिंघल व पाटील यांनी सांगितले. यापूर्वी सापडलेल्या अवैध शस्त्रांच्या प्रकरणात मूळ पुरवठादारापर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाही. ही साखळी परराज्यापर्यंत असल्याने तेथील पोलिसांशी समन्वय साधून कारवाईचा प्रयत्न केला जात असल्याचे सिंघल यांनी नमूद केले.

दुसरी घटना रिध्दी सिध्दी टॉवरच्या मागील भागातील स्मशानभूमीत उघडकीस आली. दोन संशयित कंबरेला शस्त्र लावून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. त्यावेळी दशरथ बाळू ठमके (२५, गौरी पटांगण) आणि प्रकाश देवराम खांदवे (२५, गौरी पटांगण) यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन तलवारी, लहान मोठे सहा कोयते, चार चॉपर व एक चाकू अशी घातक हत्यारे जप्त करण्यात आली. उज्वलम् अ‍ॅग्रो आंतरराज्य सहकारी सोसायटीच्या संस्थेत पोलीस हवालदार असल्याची बतावणी करून माहितीच्या अधिकारात वेळोवेळी विविध माहिती घेऊन खंडणी उकळल्या प्रकरणी अटक झालेल्या गणेश कंकाळ आणि प्रशांत अलई या संशयितांकडून दोन लाखाची रोकड, दोन पिस्तुल, ३० जिवंत काडतुसे असा चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तीन दिवसांपूर्वी गावठी कट्टा विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या विजय राजेंद्र पाटील (१९, अमरधाम) आणि चेतन रवींद्र इंगोले (१९, तलाठी कॉलनी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडूनही एक गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 1:31 am

Web Title: nine country made pistol and cartridges seized by police at nashik
Next Stories
1 पर्यावरणस्नेही विसर्जनाकडे वाढता कल
2 मतिमंद मुलांच्या स्वकमाईचा ‘श्रीगणेशा’
3 नोटीस बजावली, कारवाई केव्हा?
Just Now!
X