सातव्या दिवशी घरी परतल्याने कुटुंबीयांना दिलासा=

कामाच्या तणावामुळे आपण जीवनयात्रा संपवीत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेले महानगरपालिकेचे साहाय्यक अभियंता रवी पाटील हे सातव्या दिवशी सकाळी अखेर घरी परतले आणि त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांना शोधण्यासाठी धडपड करणाऱ्या पोलीस यंत्रणेचा जीव भांडय़ात पडला. या काळात पाटील इंदूर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, अक्कलकोट या तीर्थक्षेत्री जाऊन आले. या प्रवासात त्यांनी केवळ एकदाच म्हणजे इंदूर-पुणे असा रेल्वेने प्रवास केला. उर्वरित प्रवास बसने केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.

मागील शनिवारी ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमासाठी निघाल्याचे सांगून घराबाहेर पडलेले पाटील हे सलग सहा दिवस बेपत्ता होते. जाताना त्यांनी भ्रमणध्वनी आपल्या मोटारीत ठेवला आणि सोबत चिठ्ठी लिहून ठेवली. कामाच्या तणावामुळे आपण जीवन संपवीत आहोत असे चिठ्ठीत नमूद केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन  रेल्वे पोलिसांसह राज्यभरातील पोलिसांची मदत घेण्यात आली. तथापि, पाटील यांचा थांगपत्ता लागत नसल्याने पाटील कुटुंबीयांची अस्वस्थता वाढली.

याच काळात पाटील यांची मुलगी भाग्येशा हिचा वाढदिवस आणि नंतर सीबीएससीचा दहावीचा निकाल जाहीर झाला. किमान यासाठी ते संपर्क साधतील, ही कुटुंबीयांची आशा फोल ठरली होती. याच काळात त्यांचे ई मेल खाते पुण्यातून वापरले गेल्याचे निष्पन्न झाल्यावर पुण्यातील स्वारगेट येथून गुरुवारी रात्री त्यांना ताब्यात घेण्यात आले. पहाटे नाशिकला आल्यावर त्यांचे जाबजबाब नोंदविण्यात आले. जबाब घेतल्यावर पाटील यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

मागील शनिवारी घराबाहेर पडल्यानंतर ते बसने प्रथम इंदूरला गेले. तेथून इंदूर-पुणे असा त्यांनी रेल्वेने प्रवास केला. या काळात गाणगापूर, नरसोबाची वाडी या तीर्थक्षेत्री ते गेल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. घटनेचा संबंध ग्रीनफील्ड लॉन्सवरील कारवाईशी जोडला गेला. स्थगिती असताना संरक्षक भिंत पाडल्याने उपरोक्त प्रकरणातआयुक्त तुकाराम मुंढे यांना उच्च न्यायालयाची माफी मागावी लागली. न्यायालयाने ती भिंत पुन्हा बांधून देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाशी पाटील यांचा संबंध असल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे. प्रशासन प्रमुखांच्या कार्यपद्धतीमुळे तणाव वाढल्याची तक्रार पाटील कुटुंबीयांनी केली होती. घरी परतल्यावर ते फारसे बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. महापौर रंजना भानसी यांच्यासह पालिकेतील अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन धीर दिला.

शहनिशेनंतर पुढील कारवाई

बेपत्ता झालेले महापालिकेचे उपअभियंता रवी पाटील घरी आल्यानंतर त्यांच्यावरील तणावाबाबत त्यांनी कोणाला दोषी ठरविले आहे का असे अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. याबाबबत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंग यांना विचारले असता, उपअभियंता रवी पाटील यांनी जबाबात कोणावर काही आक्षेप घेतले आहेत काय याची चौकशी सुरू आहे. त्याची शहनिशा करून पुढील कार्यवाही निश्चित होईल, असे आयुक्तांनी सांगितले आहे.