राज्यातील महापालिका निवडणुकांची ‘दंगल’ आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. सर्वच पक्षांमध्ये बंडाळी उफाळून आल्याचे चित्र आहे.
नाशिकमधील शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांच्या समर्थकांत आज जोरदार हाणामारी झाली. विनायक पांडे यांचा मुलगा ऋतुराज याला तिकीट न देता राष्ट्रवादीच्या एका नेत्याला तिकीट दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी मात्र, हाणामारीच्या वृत्ताचे खंडन केले आहे. केवळ बाचाबाची झाली होती, हाणामारी झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील एका हॉटेलमध्ये शिवसेना आमदार, नेते आणि पदाधिकारी बसलेले होते. शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांचा मुलगा या ठिकाणी गेला असता, आपले तिकीट का कापण्यात आले, अशी विचारणा त्यांनी वरिष्ठ नेत्यांना केली. यावेळी त्यांच्यात प्रचंड वाद निर्माण झाला. त्याचे पर्यावसन दोन्ही नेत्यांच्या समर्थकांच्या हाणामारीत झाले. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांच्या गोंधळामुळे प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हस्तक्षेप करून वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते शांत होत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. विनायक पांडे यांनी या प्रकरणी शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते व विजय करंजकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या दोघांनी पैसे खाऊन तिकीट वाटप केले आहे. ‘मातोश्री’ माझे दैवत आहे. पक्षावर माझी श्रद्धा आहे. संपूर्ण पक्षाला या दोघांनी वेठीस धरलेले आहे. या दोघांना आवरा नाही तर पक्षाची वाट लागल्याशिवाय राहणार नसल्याचेही ते म्हणाले.माझ्या मुलाच्या तिकीटाबद्दल मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी स्वतः बोललो. ते बोलले की मी स्वतः यात लक्ष देईन. इथे मात्र माझ्या मुलाचे तिकीट कापण्यात आले. याबाबत या दोघांना विचारले असता, हा निर्णय पक्षप्रमुखांनी घेतला असल्याचे ते म्हणाले. हा निर्णय स्थानिक पातळीवरच या लोकांनी घेतला असल्याचेही ते म्हणाले. ”तिकीट वाटप पक्षप्रमुखांनीच केलेले आहे. पांडे यांना आपल्या घरातच अनेक तिकिटे हवी होती. मग इतर कार्यकर्त्यांनी काय करायचे,” असे शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.