ठेकेदारावर कारवाईचा निर्णय; डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय दुर्घटना

नाशिक : महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायूच्या टाकीतील गळतीमुळे घडलेल्या दुर्घटनेचे राजकीय पातळीवर तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्य शासनाने या घटनेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापन केली. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने या प्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी समिती स्थापन करून रुग्णालयात प्राणवायू टाकी बसविणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत मूळ घटनेचे गांभिर्य लोप पावत असल्याचे चित्र आहे.

बुधवारी प्राणवायूच्या टाकीला गळती होऊन झाकीर हुसेन रुग्णालयात हाहाकार उडाला होता. वेळेवर प्राणवायू न मिळाल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचे पडसाद गुरूवारी स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले. रुग्णालयातील मृत्यू तांडवामुळे रुग्णालय व्यवस्थापनासह प्रशासकीय यंत्रणाही हादरली. या घटनेनंतर रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत राजकीय नेत्यांची रिघ लागली होती. रुग्णालयात भेट देणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुध्द नातेवाईकांकडून संतप्त भावना व्यक्त झाल्या.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची उच्चस्तरीय समितीची स्थापन करण्यात आल्याचे जाहीर केले. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नियमावली तयार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते

दरेकर यांनी या घटनेला राज्य सरकारला जबाबदार धरले. या प्रकरणाची जबाबदारी सरकारची असल्याचा आरोप करीत रुग्णांना प्राणवायू पुरविण्याची मागणी केली. महापालिकेत भाजपची सत्ता असून त्यांच्या कार्यकाळात प्राणवायूच्या टाकीचे काम पुण्यातील एका कंपनीला देण्यात आले होते. हा धागा पकडून शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी भाजपला लक्ष्य केले.

या घटनेस जबाबदार असणारा ठेकेदार असो किं वा त्यास पाठिशी घालणारा अधिकारी असो संबधितांची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत भाजपच्आ स्थायी सभापतींनी या दुर्घटनेची महापालिके कडून स्वतंत्रपणे चौकशी करण्याचा निर्णय घेतला. या समितीत नगरसेवक आणि काही अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निश्चित झाले. प्राणवायूची टाकी बसविणाऱ्या ठेकेदारावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. टाकीचा ठेका देण्यासाठी विशिष्ट अधिकाऱ्याने अटी-शर्तीत बदल केल्याचे आक्षेप सदस्यांनी केले. नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयातील प्राणवायूच्या टाकीची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली.

पालिका प्रशासनाने आक्षेपांचे खंडन केले. प्राणवायू टाकी, रुग्णालयातील वितरण व्यवस्था यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या. त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. प्राणवायूच्या व्यवस्थेसाठी रुग्णालयात पालिकेचे दोन अभियंते नियुक्त करण्यात आले आहेत.