करोना विरोधातील लढाईत अंगणवाडी सेविका, मदतनीसही आघाडीवर

नाशिक : महापालिकेतर्फे शहरातील ३३७ अंगणवाडय़ांतील तब्बल ११ हजार ३९६ विद्यार्थ्यांना घरपोच सकस आहार पोहोचविण्यात आला आहे. २० अंगणवाडय़ा प्रतिबंधित क्षेत्रातील असल्याने तेथे वितरण करण्यास मर्यादा आल्या. या आहारामुळे करोना संकटात हजारो विद्यार्थ्यांची प्रतिकारक्षमता वाढविण्यास हातभार लागणार आहे.

करोना विषाणू प्रादुर्भाव आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत अंगणवाडीतील बालकांना घरपोच सकस आहार पुरविण्याची सूचना सरकारने केली होती. महापालिका क्षेत्रात एकूण ३५७ अंगणवाडय़ा कार्यरत असून यात सुमारे १२ हजार बालके शिक्षण घेत आहेत. करोनाच्या टाळेबंदीमुळे शासनाच्या निर्देशानुसार अंगणवाडय़ा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अंगणवाडय़ा बंद असूनही सकस आहार संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यामार्फत पेलण्यात आल्याचे उपायुक्त अर्चना तांबे यांनी सांगितले.

या आहारात शेंगदाणे, गूळ, कच्ची मटकी आणि केळी यांचा अंतर्भाव आहे. सकस आहार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मार्फत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन देण्यात आला. आहार वाटप करणाऱ्या सेविका, मदतनीसांना मास्क, सॅनिटायझर, हातमोजे, वैयक्तीक संरक्षक पोषाख (पीपीई संच) उपलब्ध करून देण्यात आले. या शिवाय सकस आहार वितरित करतांना सामाजिक अंतर राखणे आणि संरक्षक साहित्याचा वापर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून या आहाराचे वितरण करण्यात आले. १२ हजारपैकी ११ हजार ३९३ अंगणवाडय़ांना सकस आहाराचे वितरण करण्यात आले. २० अंगणवाडय़ा प्रतिबंधित क्षेत्रातील असल्याने तिथे आता वितरण करता येणार नाही. या अंगणवाडय़ातील ६०४ विद्यार्थ्यांना नंतर त्याचे वाटप होईल.

सर्वेक्षणाचीही जबाबदारी

सकस आहाराच्या वितरणाबरोबर १२४ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस वैद्यकीय विभागाच्या पथकासोबत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाची जबाबदारी सांभाळत आहेत. ज्या भागात करोना रुग्ण सापडतो तेथील ३०० ते ५०० मीटरचे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून जाहीर होते. त्या भागात घरोघरी ही पथके सर्वेक्षण करतात. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जीव धोक्यात घालून काम करत असल्याने वैद्यकीय विभागामार्फत त्यांना २५ लाखाचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.