तीन महिने शाळा बंद ठेवण्याचा संस्थेचा विचार

महापालिकेच्या वतीने अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा रस्ता स्मार्ट करण्यासाठी वाहतुकीवर र्निबध आणत एका बाजूने रस्त्यावरील काही भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या रस्त्यालगत असलेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांचा कोणताही विचार न केल्याने शाळा काही महिन्याच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याची वेळ संस्थांवर आली आहे. तसे झाल्यास शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळात उपस्थित होत आहे. दरम्यान, या येथील कामाचा मोठा फटका बिटको शाळेला बसणार आहे. पाठोपाठ आदर्श शाळेसमोरही हा प्रश्न उभा राहिला आहे. शुक्रवारी अर्थात शाळा उघडण्याच्या पहिल्या दिवशी नेमके काय घडते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या पथदर्शी अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका स्मार्ट रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीवर र्निबध घालण्यात आले आहेत. सद्यस्थितीत मेहेर सिग्नल ते सीबीएस या मार्गावरील एक बाजू वाहतुकीसाठी बंद करण्यात आली असून दुसऱ्या बाजूने दुहेरी वाहतूक सुरू आहे. पुढील टप्प्यात हे र्निबध सीबीएस ते त्र्यंबक नाका आणि मेहेर सिग्नल ते अशोक स्तंभ या भागातही लागू होतील. वाहतूक र्निबधामुळे या मार्गावर वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. वाहनधारकांना मार्गस्थ होण्यास १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. या स्थितीत परिसरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या गर्दीचे नियोजन करायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

न्यायालयासमोरील बाजूकडे वाहतूक बंद केलेल्या मार्गावर डी. डी. बिटको गर्ल्स हायस्कूल, वाय. डी. बिटको बॉईज स्कूल, शासकीय कन्या विद्यालय आहे. काम सुरू असलेल्या रस्त्याच्या दर्शनी भागात पत्रे लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुख्य रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्या रस्त्यावर डांबर, कचऱ्याचे ढीग असल्याने पायी चालणे अवघड आहे. या परिसरातील शाळा सकाळ आणि दुपार सत्रात भरतात. त्यामुळे दररोज पाच ते सात हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची ये-जा असते. त्यांची ने-आण करणारी वाहने, पालकांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वाहने यांची ये-जा कशी होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. न्यायालयालगतचा रस्ता खुला असला तरी तिथे वाहने थांबविण्यास परवानगी नाही. अशा स्थितीत शाळेचा पहिला दिवस, त्यावेळी होणारी गर्दी याचे नियोजन कसे करायचे, असा गुंता शालेय व्यवस्थापनापुढे आहे. पावसाळ्यात शाळेच्या मुख्य रस्त्यासमोरील खोदकाम, मातीचा ढीग तुडवत मुले वर्गात येणार कशी, या स्थितीत पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार होतील का, वाहने कुठे लावायची, अशा अनेक प्रश्नांची मालिका समोर आहे.

हीच स्थिती पुढील काळात आदर्श शाळेबाबत उद्भवणार आहे. शिक्षकांनी सीबीएस येथील वाहन तळावर २०० रुपये महिना दराने वाहन लावण्याची व्यवस्था केली आहे. पालक, विद्यार्थ्यांचे काय, त्यांच्या रिक्षा, व्हॅन यांचा थांबा कुठे, विद्यार्थी गर्दीच्या वेळात रस्ता कसा ओलांडणार, पालक मुलांचा जीव धोक्यात घालतील का, या प्रश्नांनी शालेय व्यवस्थापन जेरीस आले आहे. दुसरीकडे महापालिका, स्मार्ट सिटी कंपनी, वाहतूक पोलीस या विषयावर टोलवाटोलवी करण्यात दंग आहे.

यंत्रणा टोलवाटोलवीत मग्न

आदर्श शाळेत इंग्रजी, मराठी माध्यमातील पाच हजारहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. त्यातील बहुतांश विद्यार्थी व्हॅन, शालेय बस ने ये-जा करतात. अशा स्थितीत त्यांची वाहने कुठे उभी राहतील?,  विद्यार्थ्यांची चढ उतार करण्यासाठी जुना आग्रा महामार्गावरील स्टेट बँक, जिल्हा बँकेसमोरील चौफुली आणि एक मार्ग पूर्ण मोकळा ठेवावा. जेणेकरून वाहने वळविणे सोपे होईल. या संदर्भात जिल्हाधिकारी, महानगरपालिका, स्मार्ट सिटी कंपनीसह वाहतूक विभाग सर्वाशी पत्रव्यवहार झाला. टोलवाटोलवीव्यतिरिक्त ठोस कार्यवाही अद्याप झालेली नाही.

उदयकुमार कुलकर्णी (विश्वस्त, बाल विद्या प्रसारक मंडळ)

यंत्रणा टोलवाटोलवीत मग्न

बिटको शैक्षणिक संस्थेने विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे दोन दरवाजे खुले करावे अशी मागणी केली आहे. त्या मागणीनुसार मैदानावर कच, मुरूम टाकत पावसाळ्यात विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यादृष्टीने रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसेच आदर्श शाळेसाठी काही पर्यायी व्यवस्था होत नसल्याने शाळेसमोरील रस्त्याचा काही भाग मोकळा सोडत पुढील काम करण्यात येईल.

प्रकाश थविल  (मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक महानगर स्मार्ट सिटी कॉपरेरेट लि.)

विद्यार्थी शाळेत कसे येतील?

शाळेचा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. मातीचे ढीग ओलांडत मुले येणार कशी ?, छत्रपती शिवाजी स्टेडियमचा एक पर्याय असला तरी स्टेडियमवालेही दबाव आणत आहेत. विद्यार्थ्यांनी धावपट्टीवरून न येता संरक्षण भिंतीच्या कडेने यावे. ऐन पावसाळ्यात ही मुले महात्मा गांधी रस्त्यावरून शाळेत पावसाचे पाणी तुडवत कशी येणार? व्हॅन किंवा रिक्षाने येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलांना महात्मा गांधी रस्त्यावर एकटे सोडतील काय? पाऊलवाट तयार करण्यात येत असली तरी एकाच वेळी सुटणाऱ्या गर्दीत काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? या सर्व परिस्थितीचा विचार केल्यास वर्गात केवळ बोटावर मोजण्याइतकी मुले उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर, शाळा अप्रत्यक्षरित्या तीन महिने बंदच राहील अशी स्थिती आहे. गृहरक्षक दलाच्या कार्यालयाजवळील मोकळ्या जागी शाळेची वाहने थांबविण्याचा एक पर्याय सुचविण्यात आला आहे. त्याबाबत टाळाटाळ होत आहे. पाचवी ते सातवीतील पाल्यांचे पालक काही अंशी दुर्लक्ष करतील, परंतु दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे काय ?  त्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण?

प्रकाश वैशंपायन  (अध्यक्ष, दि न्यू एज्युकेशन इन्स्टिटय़ूट)