कार्यशैली चुकीची असल्याचा आरोप

मुख्य बाजारपेठेतील अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यासाठी महानगरपालिकेने निवडलेला दिवस व्यापाऱ्यांच्या रोषाचे कारण ठरला. बुधवार हा आठवडे बाजाराचा दिवस असतो. मुख्य बाजारपेठेत या दिवशी लाखोंची उलाढाल होते. याच दिवशी महापालिकेच्या कारवाईमुळे दैनंदिन व्यवसायावर परिणाम झाल्याने व्यापारी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पालिकेची कार्यशैली ही चुकीची असल्याचा आरोप  काहीं व्याप्याऱ्यानी केला.

महापालिकेच्या पथकाने मेनरोड ते दहीपूल यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अनधिकृत इमारत पाडण्याचे काम सकाळी साडेदहा वाजता जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्री घेऊन सुरू केले. या पाश्र्वभूमीवर परिसरातल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

पक्क्या स्वरूपाची इमारत पाडताना धुळीचे लोट उडतील. यामुळे आसपासच्या दुकानांचे अप्रत्यक्षपणे नुकसान होईल हे लक्षात घेऊन नेहरू चौकातील कपडे, खाद्य पदार्थ आणि तत्सम सर्व दुकाने व्यापाऱ्यांना बंद करावी लागली. गोदावरीच्या काठावरून मेन रोडकडे येण्याचा महत्त्वाचा मार्ग बंद असल्याचा फटका आसपासच्या व्यापाऱ्यांना बसला.

मुख्य बाजारपेठेत या दिवशी मोठी उलाढाल होत असते. या परिसरातून खरेदीसाठी गोदावरी काठाकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. मुख्य रस्ता बंद असल्याने आणि अन्य पर्यायी अरुंद मार्गावर वाहनधारकांची गर्दी झाल्यामुळे अनेकांनी या दिवशी बाजारात जाणे टाळले. या कारवाईमुळे दैनंदिन व्यवसायावर परिणाम झाल्याची भावना अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. ज्या व्यापाऱ्याची इमारत जमीनदोस्त झाली, त्याची ती स्वत:ची जागा आहे. मेन रोडपासून दहीपुलाकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूंना ज्या इमारती अस्तित्वात आहेत, त्या सर्व एकाच रांगेत आहेत. संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करून पालिका इतर व्यापाऱ्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार अनेकांनी केली. एखादा अधिकारी नावलौकिकासाठी व्यापाऱ्यांची रोजीरोटी बंद करीत असून ही कार्यशैली चुकीची असल्याचा आरोपही काही व्यापाऱ्यांनी केला.