सद्यस्थितीची माहिती मिळण्यासाठी महापालिकेचे अ‍ॅप

नाशिक : करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे पार्थिवांच्याअंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांना प्रतीक्षा करावी लागत असून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हे लक्षात घेऊन महापालिकेने हा त्रास कमी करण्यासाठी ‘डब्लूडब्लूडब्लू. क्रिमेशन.एनएमसी.जीओव्ही. इन’ हे वेब अ‍ॅप तयार केले आहे. त्या अंतर्गत नागरिकांना लगतच्या अमरधाम मधील सद्यस्थिती कळेल. शिवाय आवश्यक ती माहिती भरून अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी वेळ निश्चितीसाठी नोंदणी करता येणार आहे.

नोंदणी झाल्यानंतर अर्जदाराला लघूसंदेशाद्वारे माहिती दिली जाणार असून गुरूवारी रात्रीपासून अ‍ॅपधारीत व्यवस्था कार्यान्वित झाली. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शहरातील सर्व स्मशानभूमींवर (अमरधाम) कमालीचा ताण आला असून एप्रिल महिन्यात या सर्व ठिकाणी दिवसाला १४७ मयतांवर अंत्यसंस्कार झाले होते. यात करोनाबाधितांसह अन्य कारणांनी मयत झालेल्यांचा समावेश आहे. या काळात अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना बराच काळ तिष्ठत बसावे लागले. परिस्थितीत अजूनही कोणतीच सुधारणा न झाल्याने मयतांच्या नातेवाईकांना वाट पाहण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. शिवाय या परिस्थितीचा लाभ घेऊन तेथील कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी करण्यासारखे प्रकारही घडू लागले. याविषयी अनेकांनी नगरसेवकांसह अधिकाऱ्यांकडेही तक्रोरी के ल्या. हे सर्व बघता मयतांच्या नातेवाईकांचे हाल थांबावेत आणि पार्थिवाची होणारी हेळसांडही थांबावी यासाठी महापालिके कडून वेब अ‍ॅप प्रणाली तयार करण्यात आली आहे. या प्रणालीचा नागरिकांना उपयोग होऊन त्यांची समस्या दूर होण्याची शक्यता आहे.

विभागनिहाय अमरधामची सद्यस्थिती आणि अंत्यसंस्कारासाठी कालावधी नोंदणीची व्यवस्था या माध्यमातून करण्यात आली आहे. माहिती भरून नागरिक हव्या त्या विभागातील अमरधाममधील वेळ नोंदणी करू शकतात. ही प्रक्रिया झाल्यानंतर अर्जदाराला संदेश पाठविला जाईल. नोंदणीची पावती डाऊनलोड करता येईल. या व्यवस्थेद्वारे नागरिकांना सर्व विभागातील अमरधाम ‘गुगल लोकेशन’च्या माध्यमातून शोधणेही सुलभ होणार आहे. शहरात सर्व विभागात एकूण २७ अमरधाम असून तिथे ९० खाटा आहेत. अ‍ॅपमध्ये त्या भागातील सेवा देणाऱ्या सर्व व्यक्तींचे नाव, भ्रमणध्वनी  क्रमांक दिलेला आहे. यामुळे नागरीकांना करावी लागणारी प्रतिक्षा आणि मानसिक त्रास दूर होण्यास मदत होईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे. ही सुविधा पूर्णत: मोफत आहे. याकरीता कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे अमरधाममध्ये पैसे मागण्याच्या तक्रोरीं आपोआप निकाली निघणार आहेत. नागरीकांनी या सुविधेचा वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.