News Flash

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव

मुंढे हे एकाधिकारशाहीने वागून नगरसेवकांची बदनामी करत असल्याचा ठपका ठेवत अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपाने घेतला.

तुकाराम मुंढे

नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी ज्या तुकाराम मुंढे यांच्यावर सोपविली आहे, त्यांच्याच विरोधात अविश्वास ठराव आणण्यास भाजपाने पुढाकार घेतला आहे. या अविश्वास ठरावासाठी महापालिकेत सोमवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाने मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी नगरसचिवांना पत्र दिले आहे. विशेष म्हणजे भाजपामधील एका गटाचा याला विरोध आहे. महापौर रंजना भानसी यांनी मुंढे हे हुकूमशाही करत असल्याचा आरोप केला. मुंढे हे एकाधिकारशाहीने वागून नगरसेवकांची बदनामी करत असल्याचा ठपका ठेवत अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपाने घेतला आहे.

करवाढ रद्द करण्याच्या महासभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत मुंढेंच्या आदेशानुसार मनपा प्रशासनाने वाढीव दराने घरपट्टीची देयके वितरीत करण्यास सुरूवात केल्याने नगरसेवक संतापले आहेत.

नाशिक मनपामध्ये १२७ नगरसेवक आहेत. शुक्रवारी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत ठरल्याप्रमाणे नगरसचिवांना अविश्वास ठरावाबाबत पत्र देण्यात आले. अविश्वास प्रस्तावावरून शिवसेनेमध्येही दोन गट पडल्याचे सांगण्यात येते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचीही भूमिका अजून स्पष्ट नाही. मनसेमध्येही संदिग्धता असल्याचे सांगण्यात येते.

यापूर्वी मुंढे हे नवी मुंबई महापलिकेचे आयुक्त असतानाही त्यांना महापौरांसह नगरसेवकांचा विरोध पत्कारावा लागला होता. त्यानंतर पुणे येथे पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तिथेही त्यांना विरोध झाला. पीएमपीएमएल येथून नाशिकला त्यांची बदली करण्यात आली. तिथेही सत्ताधारी विरोधात गेल्याचे चित्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 1:47 pm

Web Title: no confidence motion proposal against nashik municipal corporation commissioner tukaram mundhe
Next Stories
1 तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाच्या हालचाली
2 डास उत्पत्तीचे खापर नागरिकांच्या माथी
3 अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी रामकुंडात विसर्जित
Just Now!
X