पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर तक्रारी

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर बस सेवेचा प्रस्ताव सादर करताना सत्ताधाऱ्यांना विश्वासात घेतले नाही, परस्पर विकास कामे निश्चित केली जातात, नगरसेवकांची ५० हजार रुपयांची कामेही होत नाही, गणेशोत्सवात मंडळांना मुरूम, कच देण्यास हात आखडता घेतला जातो.. अशा विविध तक्रारींचा पाढा शनिवारी भाजपच्या महापौरांसह नगरसेवकांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर वाचला. स्मार्ट सिटी अंतर्गत चाललेल्या विकास कामांचे समर्थन करण्याच्या मुद्यावरून महिला आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष असणारे आमदार यांच्यात शाब्दीक वादंग झाल्याचे सांगितले जाते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहात भाजप पदाधिकाऱ्यांनी महाजन यांच्यासमोर पालिका आयुक्तांविरोधातील रोष प्रगट केला. मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून आयुक्तांनी वाढीव मालमत्ता करात कपात केली. परंतु, शेतजमिनी, मोकळ्या भूखंडावर कर आकारणी आम्हाला मान्य नसल्याचे दोन आमदारांनी स्पष्ट केले. करवाढीला विरोध कायम आहे. महापौरांनी आपली व्यथा मांडल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने आगामी सर्वसाधारण सभेत शहर बस सेवेचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याबद्दल भाजपचे पदाधिकारी अनभिज्ञ आहेत. प्रशासनाने भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देणे, विश्वासात घेणे गरजेचे होते. तो प्रस्ताव महापालिकेच्या फायद्याचा की तोटय़ाचा, त्याची स्पष्टता केलेली नाही. आयुक्त मनमानीपणे कारभार करतात, नगरसेवकांच्या लहानसहान कामांची फाईल मंजूर होत नाही. कामे होत नसल्याने प्रभागात फिरणे अवघड झाल्याची व्यथा काहींनी मांडली. महापालिकेतील गणपतीच्या आरतीची वेळ बदलून अनुपस्थित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याची धमकी दिली जात असल्याकडे काहींनी लक्ष वेधले. गणेशोत्सवात महापालिका दरवर्षी गणेश मंडळांच्या मागणीनुसार मुरूम, कच उपलब्ध करते. पावसामुळे मंडपालगत चिखल होऊ नये म्हणून तिचा उपयोग होतो. या वर्षी गणेश मंडळांना केवळ पाच ते सहा पाटय़ा कच, मुरूम देण्याचे फर्मान काढले गेले. प्रत्येक गोष्टीत नगरसेवकांची अडवणूक केली जाते. नगरसेवकांच्या शब्दाला प्रशासन किंमत देत नाही, अशा तक्रारी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या गेल्या. ही स्थिती कायम राहणार असल्यास महापालिकाच बरखास्त करावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवकाने केली. यावेळी विश्रामगृहातील दालनाबाहेर जमलेल्या आमदारांमध्ये वादावादी झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.