‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर करण्याची मागणी
तालुक्यातील एकलहरे येथील औष्णिक विद्युत केंद्रातील प्रस्तावित ६६० मेगाव्ॉट प्रकल्पातील चिमणीपासून एक किलोमीटरचा परिसर ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर करावा, अशी मागणी खा. हेमंत गोडसे यांनी देवळालीतील लष्करी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या चिमणीच्या उंचीला लष्कराने घेतलेली हरकत व त्यामुळे प्रकल्पाचे रखडलेले काम, या पाश्र्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. या प्रकल्पाविषयी राज्य शासनाची उदासीनता व पाठपुराव्याबाबत होणारा विलंब या बाबी मागील आठवडय़ात संरक्षण मंत्रालयातील चर्चेदरम्यान उघड झाल्या आहेत. यापूर्वीही खा. गोडसे यांनी लष्करी अधिकाऱ्यांबरोबर चिमणीच्या उंचीबाबत चर्चा करताना सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी केली होती. मात्र लष्कराच्या हवाई दलाची विमाने या भागात भ्रमण करीत असून १५० मीटर उंचीपेक्षा जादा उंचीला लष्करी कायद्यानुसार हरकत आहे. तथापि, पर्यावरण विभागाच्या आदेशानुसार २६० मीटर उंचीच्या आत कोणत्याही वीज प्रकल्पाच्या चिमणीची उभारणी करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. लष्कर व पर्यावरण विभाग या दोघांच्या तांत्रिक बाबींमुळे सदर प्रकल्प अडकला असून वेळेत याबाबत निर्णय न झाल्यास इतरत्र स्थलांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रिगेडियर प्रदीप कौल, बोंडे यांच्याबरोबर चर्चा करताना गोडसे यांच्यासह आ. योगेश घोलप, छावणी परिषदेचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे, शहजाद पटेल, सुभाष बुंदेले, महावितरणचे कार्यकारी अभियंता, आदी उपस्थित होते. यावेळी गोडसे यांनी ओझर विमानतळाची ज्याप्रमाणे संरक्षण विभागाकडून हवाई मोजणी केली जाणार आहे, त्याच धर्तीवर एकलहरे येथील प्रस्तावित प्रकल्पाची मोजणी करण्यात यावी, अशी सूचना करून प्रकल्पाच्या चिमणीपासूनचा एक किलोमीटरचा परिसर हा लष्करासाठी ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर करावा, अशी मागणी केली.
यावेळी ब्रिगेडियर कौल यांनी संरक्षण मंत्रालयाकडून यासंदर्भात आदेश प्राप्त झाल्यास कार्यवाही करण्यात येईल, असे नमूद केले. या चर्चेदरम्यान गोडसे यांनी पंजाब येथील भटिंडा येथील औष्णिक वीज केंद्राच्या चिमणीला अशाच प्रकारे परवानगी दिली असल्याचे निदर्शनास आणून दिले.