शिक्षण विभागही अनभिज्ञ

दीपावली सुटीचा आनंद गुलाबी थंडीत शाल पांघरून लहानग्यांसह सर्व जण घेत असताना शहरातील काही शैक्षणिक संस्थांनी शासकीय सुटीच्या नियोजनाला कात्री लावत मंगळवारपासून शाळा नियमितपणे सुरू केल्या आहेत. शासकीय परिपत्रकानुसार प्राथमिक शाळा १९ किंवा २२ नोव्हेंबर रोजी सुरू होणे अपेक्षित असताना इंग्रजी माध्यमांच्या शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. याबाबत शिक्षण विभागही अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दीपोत्सवाचा आनंद लहानग्यांना लुटता यावा यासाठी दीर्घ नसले तरी १५ ते २० दिवसांच्या सुटय़ांचे नियोजन शिक्षण विभागाचे असते. यासाठी वार्षिक वेळापत्रकात तशी तजवीजही केली जाते. यंदा मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शिक्षण विभागाच्या नियोजनाला कात्री लावली आहे. जिल्हा परिसरातील काही प्राथमिक शाळांची मंगळवारपासून दुसऱ्या सत्राची घंटा वाजली. मुलांनी बोचरा वारा अंगावर घेत उबदार कपडे परिधान करून शाळेत हजेरी लावली. सर्वाच्या आधी आपली शाळा का सुरू झाली, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

दुसरीकडे, शिक्षण विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. जिल्हा परिषद तसेच नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाला मंगळवारी काही शाळा सुरू झाल्याची पुसटशी कल्पनाही नव्हती. महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांनी शासकीय परिपत्रकानुसार मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा साधारणत: १९ आणि २२ नोव्हेंबरला सुरू होणे अपेक्षित आहे. वेळेआधीच शाळा सुरू केल्याबद्दल त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याचे शिक्षण विभागाचे वसंत आहेर यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रासाठी शिक्षण विभागाचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. त्यात स्नेह मेळावे, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रकल्प स्पर्धा आदींचे नियोजन आहे. तसेच शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या काही परीक्षांची प्रश्नपत्रिका यंदा शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. या अतिरिक्त जबाबदारीवर सध्या काम सुरू आहे.

दरम्यान, जिल्ह्य़ातील २०० हून अधिक शिक्षकांना अद्याप शालार्थ सांकेतांक मिळालेला नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाचा प्रश्न अद्याप रखडलेला आहे. संच मान्यतेबाबत शिक्षण विभागाचे धोरण अद्याप स्पष्ट नाही. अशा विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सक्तीची सुटी मिळते की नियमितपणे शाळा सुरू होते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

नाताळमध्ये सुटय़ांची भरपाई

इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. शासकीय परिपत्रकानुसार त्या १९ किंवा २६ नोव्हेंबर रोजी सुरू होत आहेत. सुटीला लागलेली कात्री पाहता ही सुटी नाताळमध्ये भरून काढण्यात येईल.       – वसंत आहेर, महापालिका, शिक्षण विभाग