वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणारे दुचाकी व चारचाकीस्वार आपल्याला देशातील कोणत्याही भागात पहावयास मिळतात. नाशिक देखील यास अपवाद नाही. अशा प्रकारच्या ‘मल्टीटास्किंग’ करणाऱ्या बेजबाबदार वाहनचालकांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. कोणतीही चूक नसताना समोरच्या वाहनचालकाची ही सवय इतर वाहनचालकाच्या जीवावर बेतते. अशा प्रकारच्या अपघातांच्या घटना देशभरात ठिकठिकाणी घडतात. तिरकी मान करून वाहन चालवणाऱ्या या चालकांना ही सवय आता चांगलीच महागात पडणार असून अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्यामुळे होणाऱ्या अपघातांना ‘ब्रेक’ लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील विविध शहरात अशा सवयीमुळे अपघात घडतात. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, ठाणे या शहरांसह नाशिकमध्ये देखील अशा स्वरूपाचे अपघात घडतात. त्यामुळे नाशिक पोलीस आयुक्तांनी देखील अशा सवयी असणाऱ्या वाहनधारकांना लगाम घालण्यासाठी कंबर कसली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिले आहेत.

वाहनचालकांनी वाहन चालवत असताना मोबाइलवर न बोलण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. शहराप्रमाणे जिल्ह्यातील वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत असून अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. अपघातांच्या घटनांमध्ये वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनधारकांमुळे अपघातांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मोबाइलवर बोलणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून अशा वाहनधारकांचे परवाने देखील निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल व प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्याकडून मोबाइलवर संभाषण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शहर वाहतूक पोलिसांकडून अशा बेजबाबदार वाहनचालकांचे परवाने जप्त करण्यात येणार असून हे परवाने प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविले जातील. यानंतर हे परवाने निलंबित केले जाणार आहेत.