महापालिका निवडणुकीला तब्बल आठ महिने लोटूनही सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत बेबनावामुळे रखडलेल्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीला अखेर सोमवारचा मुहूर्त मिळाला. भाजपतर्फे बाजीराव भागवत, प्रशांत जाधव आणि अजिंक्य साने तर शिवसेनेतर्फे सुनील गोडसे, श्यामला दीक्षित यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती झाली. या नियुक्तीनंतर आनंदोत्सव साजरा करण्याचे कारण पुढे करत महापौरांनी सभेचे कामकाज तहकूब केले. त्यास विरोधकांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो विफल ठरला.

इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे स्वीकृत नगरसेवकपदाची नावे निश्चित करणे भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरली होती. प्रदेश पातळीवर महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या पदाधिकाऱ्याचाही स्वत:ला अथवा कुटुंबातील सदस्याला स्वीकृत नगरसेवक करावे, असा आग्रह होता. पालकमंत्री, आमदार आणि अन्य पदाधिकारी आपापल्या समर्थकांची नावे रेटत असल्याने तीन नावे निश्चित करताना भाजपची अक्षरश: दमछाक झाली होती. वास्तविक, महापालिका निवडणूक झाल्यानंतर विशिष्ट कालावधीत स्वीकृत नगरसेवकांची निवड होणे अभिप्रेत आहे.

सत्ताधारी भाजप नावे देत नसल्याने प्रशासनाने काही काळ प्रतीक्षा केली. दरम्यानच्या काळात शिवसेनेने आपली नावे निश्चित करत ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. या घडामोडींमुळे प्रशासनाने भाजपला ही प्रक्रिया पुढे नेण्याची तंबी दिली. महापालिका निवडणुकीवेळी तिकीट वाटपात भाजपमध्ये गोंधळ उडाला होता, त्याची पुनरावृत्ती स्वीकृतसाठी नावे निश्चित करताना झाल्याचे अधोरेखित झाले. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला हा विषय सोमवारी सर्वसाधारण सभेत मार्गी लावण्यात आला.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप, शिवसेनेच्या सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. भाजप आणि शिवसेनेच्या संख्याबळानुसार संबंधितांच्या अनुक्रमे तीन आणि दोन सदस्यांना संधी मिळणार होती. त्यानुसार भाजपने शहर चिटणीस प्रशांत जाधव, भाजयुमोचे अजिंक्य साने आणि नाशिकरोड येथील बाजीराव भागवत तर शिवसेनेच्या श्यामला दीक्षित आणि सुनील गोडसे यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली. या निवडीनंतर सदस्यांचा महापौर, विरोधी पक्षनेते, गटनेते आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

विषय पत्रिकेतील सदस्य निवडीचा पहिला विषय मार्गी लावल्यानंतर महापौरांनी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सभा तहकूब केली जात असल्याचे सांगून राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याची सूचना केली. अकस्मात झालेल्या या घडामोडींवर राष्ट्रवादीसह इतर पक्षाच्या गटनेत्यांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. गजानन शेलार यांनी महापौरांनी राष्ट्रगीताचा अवमान करीत असल्याचा आरोप केला. विषय पत्रिकेवर अनेक महत्वाचे विषय असताना सभा स्थगित ठेवण्याच्या कार्यशैलीवर विरोधकांनी नाराजी प्रगट केली. भाजप कार्यकर्त्यांनी महापौरांच्या रामायण बंगल्यासमोर फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला.