देशासह राज्यात टाळेबंदी लागू झाल्यानंतर अनेक जण वेगवेगळ्या भागात अडकून पडले. यामध्ये विद्यार्थी, मजूर, कामगार, पर्यटक आणि इतर नागरिकांचा समावेश आहे. काहींना अत्यावश्यक, वैद्यकीय कारणास्तव इतरत्र जायचे होते. या काळात शहर पोलिसांच्या करोना संपर्क कक्षाने आतापर्यंत ३४ हजार ७५९ ई पास अर्थात परवानग्या दिल्या आहेत. स्थलांतरित मजुरांना पाठविण्यासाठी परराज्यांशी ई मेलद्वारे वारंवार संपर्क साधला जात असून त्यास राजस्थान आणि गुजरात वगळता अन्य राज्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामध्ये उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आदी राज्याकडून ना हरकत दाखला मिळत नसल्याने त्या त्या राज्यातील मजूर अडकून पडले आहेत.

देशासह राज्यात २४ एप्रिलपासून टाळेबंदी लागू झाली. या काळात अत्यावश्यक, वैद्यकीय कारणास्तव बाहेरील राज्यात, जिल्ह्य़ात वा शहरातून घराबाहेर पडायचे असल्यास ई पास द्वारे परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आली. ई पास परवानगी देण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांच्या आदेशानुसार करोना संपर्क कक्ष (मदतवाहिनी) सुरू करण्यात आला. या कक्षातील अधिकारी, कर्मचारी अहोरात्र कर्तव्यावर हजर

राहून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासोबत शहर, शहराबाहेर महाराष्ट्रात आणि बाहेरील राज्यात अत्यावश्यक, वैद्यकीय कारणास्तव परवानगी देण्यासाठी कार्यरत आहेत.

३० एप्रिल ते एक मे या कालावधीत शासनाच्या निर्देशानुसार टाळेबंदीत जे इतर जिल्ह्य़ात तसेच बाहेरील राज्यात अडकले, त्यांच्यासाठी विविध राज्यात, तसेच शहरात अडकलेल्या नागरिकांना परराज्यात जाण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्यावतीने व्हॉट्स अ‍ॅप, भ्रमणध्वनी, ऑनलाईनद्वारे ३४ हजार ७५९ परवानग्या देण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

२११५ परप्रांतियांना पाठविण्याची तयारी

शहरात बाहेरील राज्यातील अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटकांसह इतर नागरिकांची माहिती प्रत्येक पोलीस ठाण्याकडून संकलित करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत २११५ परप्रांतीय नागरिकांची नावानिशी माहिती महापालिका आणि जिल्हा प्रमुख अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. त्यांच्याशी समन्वय साधून संबंधित पतप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठविण्याची व्यवस्था केली जात आहे.

गुजरातसाठी १२८८ जणांना परवानगी

शहरात अडकलेल्या स्थलांतरित मजूर, पर्यटक तसेच अन्य नागरिकांच्या परवानगीसाठी परराज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी ना हरकत प्रमाणपत्रासाठी नाशिक शहरातून वेळोवेळी इ मेल करण्यात आले. परंतु, राजस्थान वगळता इतर कोणत्याही राज्याने प्रतिसाद दिला नाही. यामुळे २० मे रोजी संबंधित राज्यांच्या सचिवांशी प्रत्यक्ष ई मेलद्वारे ना हरकत प्रमाणपत्रासाठी विनंती करण्यात आली. त्यास केवळ गुजरात राज्याच्या सचिवांनी प्रतिसाद दिला. नागरिकांना गुजरातमध्ये येण्यास हरकत नसल्याचे संबंधितांनी कळविले. त्यामुळे १२८८ नागरिकांना गुजरात राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली. इतर राज्यातून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त होताच संबंधित नागरिकांना परवानगी दिली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.