‘केटीएचएम’च्या संशोधनातील निष्कष

अनिकेत साठे, नाशिक

प्लास्टिक बंदीनंतर शहरातील बहुतांश दुकानांमध्ये मुलायम कापडाप्रमाणे (नॉनवुव्हन / स्पनबाँडेड) दिसणाऱ्या पिशव्या दिल्या जाऊ लागल्या. प्लास्टिकला कापडीसदृश पिशवीचा पर्याय मिळाल्याने व्यावसायिकांबरोबर ग्राहकही सुखावले. परंतु, अल्पावधीत रुळलेल्या या नव्या पिशव्यांमध्येही प्लास्टिकच असल्याची धक्कादायक बाब के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या संशोधनातून उघड झाली आहे. या बहुतांश पिशव्यांचे विघटन होत नसून त्या देखील पर्यावरणास घातक असल्याचे उघड झाले आहे.

सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. प्रतिमा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषम वाघचौरे, वैष्णवी शिंदे, काजल वाघ, शुभांगी शिरसाठ आणि वैशाली वाकाले या विद्यार्थ्यांनी सलग सहा महिने या विषयावर काम केले. या संशोधनासाठी ‘डीबीटी स्टार कॉलेज’ अंतर्गत अनुदान मिळाले. सरकारने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली आणि दुकानांमध्ये देवाण-घेवाणीसाठी रंगीबेरंगी कापडी भासणाऱ्या पिशव्या दिसू लागल्या.  या पिशव्या तंतूमय कापडाप्रमाणे दिसतात.  मात्र, या नव्या पिशव्यांचे वास्तव संशोधनातून उघड झाले आहे.

प्रयोगासाठी नव्या धाटणीच्या पिशव्या देण्यास दुकानदार तयार नव्हते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या दुकानांमधून काही खरेदी करून त्या मिळविल्या. या सर्व पिशव्या ‘नॉन वुव्हन / स्पन बाँडेड’ म्हणजे तंतुमय, मुलायम कापडासारख्या दिसणाऱ्या होत्या. विविध दुकानांमधून लहान-मोठय़ा आकाराच्या १५ पिशव्यांचे नमुने संकलन करत तीन टप्प्यात संशोधन प्रक्रिया पार पडली. महाविद्यालयातील प्रयोगशाळेत कचरा साठणाऱ्या जागांवरील मातीतून सूक्ष्मजीव वेगळे करण्यात आले. प्रथम जिवाणू आणि नंतर बुरशीचे स्वतंत्रपणे मिश्रण बनविले गेले. त्याचा प्रत्येक पिशवीच्या तुकडय़ावर वापर करण्यात आला.

नैसर्गिक परिस्थितीत मातीमध्ये पडून राहिल्यास योग्य आद्र्रता, तापमान आणि पीएच असेल तर पिशवीचे विघटन होते. त्याचे चार महिने निरीक्षण करण्यात आले. या अंतर्गत १५ पैकी केवळ दोन पिशव्यांचे विघटन झाले. उर्वरित १३ पिशव्यांचे विघटन झाले नाही. त्यांचे नमुने आहे तसेच राहिले.

या पिशव्यांमध्ये प्लास्टिक आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी रासायनिक परीक्षण करण्यात आले. ही अतिशय महागडी चाचणी असते. त्याकरिता ‘फरियन ट्रॉन्सफॉर्मेशन इन्फा रेड’ तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत ही चाचणी करता आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. चाचणीअंती १३ पिशव्यांमध्ये पूर्णपणे अधिक घनतेचे किंवा कमी घनतेचे ‘पॉलीइथिलीन’ अर्थात प्लास्टिक आढळले. यामुळे त्या पिशव्यांचे नैसर्गिकपणे विघटन झाले नाही.

या संशोधनावर आधारित शोधनिबंध दुबई येथे आयोजित जैवतंत्रज्ञान परिषदेत अलीकडेच डॉ. प्रतिमा वाघ यांनी सादर केला. नैसर्गिक पदार्थाचा वापर करून विघटनशील पिशव्या तयार करता येतात. पण, त्यांची किंमत जास्त असल्याने त्यासारख्या दिसणाऱ्या, स्वस्तात तयार होणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या उत्पादित करून पर्यावरणाच्या हानीचे काम प्लास्टिक बंदीनंतरही कायम राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

संशोधनात केवळ दोन पिशव्यांचे नैसर्गिकपणे विघटन झाले, त्या खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या दुकानातील होत्या. त्यावर उत्पादकाचे नांव, पिशवीसाठी वापरलेले घटक यांचा उल्लेख होता. मात्र, इतर सर्व दुकानांतील कापडी भासणाऱ्या प्रत्यक्षात प्लास्टिक पिशव्यांचा आधिक्याने वापर होत आहे. नमुन्यातील उर्वरित एकाही पिशवीवर उत्पादकाचे नांव, त्यात कोणते घटक वापरले, याची स्पष्टता नाही. उत्पादकांकडून ग्राहकांची फसवणूक होत आहे. पर्यावरणास घातक ठरणाऱ्या या पिशव्या प्लास्टिकला पर्याय ठरू शकत नाही.

-प्रा. डॉ. प्रतिमा पंडित वाघ,

सूक्ष्म जीवशास्त्र विभाग, केटीएचएम महाविद्यालय्