आंदोलनानंतर वर्षभरात त्रंबकेश्वर मंदिरात एकाही महिलेचा प्रवेश नाही;

समानतेच्या मुद्दय़ावर महिलांमध्ये मतभिन्नता

प्रथा-परंपरांना आव्हान देत आणि स्थानिकांशी संघर्ष करत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करणाऱ्या तृप्ती देसाई व वनिता गुट्टे या महिलानंतर वर्षभरात एकाही महिलेने या ठिकाणी प्रवेश केलेला नसल्याचे वास्तव महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर, समोर आले आहे. तशीच स्थिती कपालेश्वर मंदिराबाबतही आहे. दस्तुरखुद्द प्रशासनातील काही महिलांनी स्थानिकांच्या विरोधामुळे गर्भगृहात प्रवेश करणे टाळले. गर्भगृह प्रवेश आंदोलनाने नेमके काय साध्य झाले, याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त होत आहेत.

शनिशिंगणापूर मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी सुरू झालेले आंदोलन नंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहापर्यंत पोहचले. १२ ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या या मंदिरात गर्भगृहात महिलांच्या प्रवेशास प्रतिबंध होता. हाच मुद्दा पकडून महिला संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. न्यायालयाने महिलांच्या प्रवेशाचा हक्क मान्य केल्यामुळे या विषयावर लढणाऱ्या भूमाता ब्रिगेड आणि स्वराज्य महिला संघटनांच्या लढय़ाला यश मिळाले.

त्र्यंबकेश्वर येथे स्वराज्य महिला संघटनेला गर्भगृह प्रवेशासाठी दोन हात करावे लागले. शेवटी पोलीस बंदोबस्तात संघटनेच्या प्रतिनिधींना गाभाऱ्यात दर्शनासाठी सोडले गेले. दुसरीकडे कपालेश्वर मंदिरात भूमाता ब्रिगेडला दोन वेळा अयशस्वी प्रयत्नानंतर पोलीस बंदोबस्तात केवळ भाविक जेथून दर्शन घेतात. त्या ठिकाणाहून दर्शन घेण्यावर समाधान मानावे लागले. ही आंदोलने स्थानिक पातळीवर चांगलीच गाजली. महिला-पुरुष समानतेची चर्चा प्रत्यक्षात आणताना रूढी-परंपरा कवटाळून बसणाऱ्या मंडळींचा विरोध प्रकर्षांने समोर आला. हा विरोध झुगारून महिलांनी त्र्यंबक राजाच्या गर्भगृहात प्रवेश मिळविला. परंतु, पुढील काळात महिलांनी ही समानता जपण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. या आंदोलनाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. त्र्यंबक मंदिराचे त्रिकालपूजक तथा विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांनी प्रवेशासाठी धडपडणाऱ्या महिलांनी निव्वळ प्रसिद्धीसाठी तेव्हा ‘स्टंटबाजी’ केल्याची स्थानिकांची भावना असल्याचे सांगितले. कारण त्या गदारोळानंतर आजतागायत आंदोलकही या ठिकाणी फिरकले नाही. त्यांच्या दर्शनाआधी स्थानिक महिलांनी दर्शन घ्यावे, असे सुचविले होते. परंतु, महिला अधिकाऱ्यांनी आम्ही प्रशासकीय कर्मचारी असून धार्मिक कार्याशी आमचा संबंध नसल्याचे सांगत त्या मुद्याला बगल दिल्याचा अनुभव शुक्ल यांनी कथन केला. त्या आंदोलनानंतर एकाही महिलेने गर्भगृहात जाण्यासाठी स्वारस्य दाखविले नसल्याचे त्यांनी सांगितले. तशीच स्थिती कपालेश्वर मंदिराबाबत आहे. त्या आंदोलनानंतर कोणत्याही महिलेने गाभाऱ्यात प्रवेश करण्याची मागणी केली नसल्याचे कपालेश्वर मंदिराचे पूजाधिकारी देवांग जानी यांनी सांगितले.

समानतेच्या अधिकारासाठी सजग होणे गरजेचे

१९५६ च्या कायद्यानुसार हिंदू मंदिरात प्रवेशाचा समानतेचा अधिकार अमलात यावा यासाठी प्रयत्न केले. राज्य घटनेने दिलेला समानतेचा अधिकार महिलांना मिळावा यासाठी हे आंदोलन होते. मंदिर प्रवेशाबाबत प्रत्येक ठिकाणी तृप्ती देसाई जाईल असे नाही. त्यासाठी स्थानिक महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्यांनी संघर्ष करत आपले अधिकार मिळवावे. १३ फेब्रुवारीला आपण त्र्यंबक राजाचे दर्शन घेणार आहे.

-तृप्ती देसाई (भूमाता ब्रिगेड)

प्रथा मोडणाऱ्यास विरोध कायम

त्र्यंबक देवस्थानला स्वतची एक परंपरा आहे. या ठिकाणी मंदिरात गर्भगृहात सोवळ्याशिवाय पुरुषांनाही प्रवेश नाही. पेशव्यांनी या मंदिराची निर्मिती केली. पण त्यांच्या महिलांनीही कधी येथे प्रवेश केला नाही. ही परंपरा चालत आली ती कोणीही मोडीत काढू नये. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. जो ही प्रथा मोडीत काढेल, त्याला विरोध करण्यात येईल.

-विजया लढ्ढा (नगराध्यक्षा, त्र्यंबकेश्वर)

परंपरांना छेद देण्याची कृती चुकीची

भारतात प्रत्येक देवस्थानचा महिमा वेगळा असून त्यास वेगवेगळी परंपरा आहे. त्याचे जतन करत हा संस्कृतीचा वारसा पुढील पिढीकडे सोपविणे आपले कर्तव्य आहे. काही भ्रामक कल्पनांसाठी त्या परंपरांना छेद जाईल, अशी कृती करणे चुकीचे आहे. देवाला स्त्री-पुरुष समान असून त्याच्या दारी कुठलाही भेदभाव नाही.

-ललिता शिंदे

(विश्वस्त, त्र्यंबक देवस्थान)