अमावस्येच्या भीतीने पहिल्या दिवशी केवळ ३१ ऑनलाईन अर्ज; अर्ज भरण्यास सुरूवात

महापालिका निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी अमावस्या असल्याने बहुतांश इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज भरण्याकडे पाठ फिरविल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे पालिका मुख्यालय व विभागीय कार्यालयांतील निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अक्षरश: हातावर हात धरून बसावे लागले. तर दुसरीकडे मात्र, अंधश्रध्दा व तत्सम बाबींवर विश्वास न ठेवणाऱ्या ३१ उमेदवारांनी २५ प्रभागांसाठी ऑनलाईन अर्ज भरले. काही इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापासून तो दाखल करण्यापर्यंतचे मुहूर्त ज्योतिषांकडून प्राप्त केले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट असल्याने काहींनी तंत्रप्रवीण नातेवाईक व मित्र-मंडळींच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्णत्वास नेण्याची तयारी केली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारी सुरूवात झाली. अर्ज भरण्याची ३ फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. प्रत्येकाला निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरणे बंधनकारक आहे. त्यासोबत शपथपत्रे व सहपत्रे जोडावी लागणार आहेत. ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रिंट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे.

या मुदतीला सुरूवात होण्याआधी पालिका प्रशासनाने इच्छुकांना ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन केले होते. प्रत्यक्ष अर्ज भरण्याचा दिवस उजाडला, तेव्हा राजकीय पक्षांसह बहुतेक इच्छुकांचा कल हा दिवस टाळण्याकडे असल्याचे दिसले. शुक्रवारी पौष अमावस्या, मौनी अमावस्या होती. पहिलाच दिवस अमावस्येचा आल्याने काही इच्छुकांनी या दिवशी ऑनलाईन अर्ज भरण्याचा विषय बाजुला ठेवला. अर्ज भरण्यासाठी एकूण आठ दिवसांची मुदत आहे. त्यात रविवारीही

अर्ज स्वीकारला जाणार असल्याने पहिल्याच दिवशी तो भरण्याची घाई का करायची, असा प्रश्न इच्छुकांनी उपस्थित केला.

प्रभागनिहाय उमेदवार निश्चित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु, संबंधितांनी उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. अधिकारी व कर्मचारी उमेदवारांच्या प्रतिक्षेत होते. इतर दिवशी विविध स्वरुपाची माहिती घेण्यात येणारे इच्छुक अंतर्धान पावल्याने संबंधितांकडून आश्चर्य व्यक्त झाले. काही इच्छुकांनी अर्ज भरणे व दाखल करण्याचे मुहूर्त ज्योतिषांकडून काढल्याचे सांगितले जाते. हा मुहूर्त टळू नये म्हणून राजकीय पक्षांनी तातडीने यादी जाहीर करावी, अशी अपेक्षा ते बाळगून आहेत.

कार्यालयात शुकशुकाट

अमावस्येच्या दिवशी अनेकांनी यावर बोलणेही टाळले. या एकंदर स्थितीत ३१ पैकी २५ प्रभागांमधून ३१ इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची माहिती महापालिकेने दिली. प्रभाग क्रमांक ५, ८, १२, १५, १९ व २३ मध्ये एकाही उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरलेला नाही. सर्वसामान्यांमध्ये अमावस्या हा दिवस अशुभ असल्याची धारणा आहे. यामुळे इच्छुकांनी हा दिवस टाळला. अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय कार्यालयात १० निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त आहेत. संबंधितांच्या कार्यालयात शुकशुकाट पहावयास मिळाला.

राजकीय पक्षांकडून यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा

शिवसेना आणि भाजप या पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. लवकर यादी जाहीर झाल्यास बंडखोरीला उधाण येईल अशी त्यांना धास्ती आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून विद्यमान नगरसेवकांच्या जागा वगळता उर्वरित जागांवरील उमेदवारांची नावे अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात येण्यास एक-दोन दिवस बाकी असताना जाहीर केली जाईल, अशी शक्यता आहे. भाजप पहिली यादी शनिवारी जाहीर करणार आहे. शिवसेना तशी तयारी करत आहे. मनसेने दोन-तीन दिवसात यादी जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी लवकर यादी जाहीर होण्याची शक्यता नाही. शुक्रवारी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची मुंबईत प्रदेश नेत्यांशी बैठक झाली. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती करावी की नाही यावर त्यात चर्चा झाल्याचे सांगितले जाते. उभयतांमध्ये मतैक्य झाल्यास जागा वाटपावरून पुन्हा स्थानिक पातळीवर चर्चा होईल. त्यात आणखी एक-दोन दिवस जाण्याची शक्यता असल्याने त्यांची यादी नंतर जाहीर होईल, अशी चिन्हे आहेत. या एकंदर स्थितीमुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांची अस्वस्थता वाढली आहे. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास अनेकांनी अपक्ष वा ज्या पक्षाकडून तिकीट मिळेल, त्यांच्याकडून रिंगणात उतरण्याची तयारी ठेवली आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर बंडोबांना कसे शांत करता येईल याचे नियोजन करण्यास सुरूवात केली आहे.