नाशिकच्या गिर्यारोहण क्षेत्रात पोरके पणाची भावना
नाशिक : शहरासह जिल्ह्य़ाच्या गिर्यारोहण क्षेत्रास उत्तुंग शिखर गाठून देणारे ज्येष्ठ गिर्यारोहक आणि वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेचे संस्थापक अविनाश जोशी ऊर्फ जोशीकाका (८०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उतारवयातही गडकिल्ले सर करण्याची तरुणांनाही लाजवेल अशी जिद्द असलेल्या जोशीकाकांच्या निधनाने नाशिकच्या गिर्यारोहण क्षेत्रात पोरके पणाची भावना निर्माण झाली आहे.
अविनाश जोशी हे गिर्यारोहकांमध्ये जोशीकाका या नावानेच प्रसिद्ध होते. महाराष्ट्र शासनाच्या शेतकी खात्यात त्यांनी नोकरी केली. वयाच्या २०व्या वर्षांपासून गिर्यारोहणाशी त्यांचा संबंध आला. सुरुवातीला युथ हॉस्टेलच्या माध्यमातून सुरू केलेल्या गिर्यारोहणानंतर नाशिकला हक्काची गिर्यारोहण संस्था असावी असा विचार त्यांनी समविचारी मंडळींसमोर
ठेवला. त्यातून १९८५ मध्ये वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण या संस्थेची त्यांनी स्थापना केली. वैनतेयचे कार्य आजही अखंडपणे सुरू आहे. अनेक संस्था आणि गिर्यारोहकांना मार्गदर्शन आणि उभारी देण्याचे काम जोशी यांनी केले.
नाशिककर गिर्यारोहक त्यांना आपला आदर्श आणि गुरु मानत. अनेक डोंगर, गडकिल्ले पालथे घालणाऱ्या जोशीकाकांना नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध,अप्रसिद्ध गड-किल्ले, डोंगरवाटा, घाटवाटा आणि त्याअनुषंगाने गावांची खडान्खडा माहिती होती. सह्यद्रीच्या कानाकोपऱ्यांत राहणारे शेकडो ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांशी त्यांचे गिर्यारोहणाच्या माध्यमातून ऋणानुबंध जुळले होते. अखिल महाराष्ट्रातील गिर्यारोहकांचा कुंभमेळा म्हणूने मुंबई येथील गिरीमित्र संमेलन ओळखले जाते. या गिरीमित्रच्या १७व्या संमेलनात जोशीकाकांना ‘गिरीमित्र जीवनगौरव पुरस्कार २०१८’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वैनतेय या नाशिकमधील घरच्या संस्थेतर्फेही त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. नाशिकमधील सिनर्जी फाऊंडेशनतर्फे त्यांना गिर्यारोहण क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला होता.
वयाचे ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ‘भटकंती आता पुरे’ म्हणून सल्ला दिला होता. परंतु, डोंगरमय झालेलं त्यांचं मन घरी रमलंच नाही. अगदी गेल्या पंधरवडय़ापर्यंत त्यांचे डोंगरवाटावरून चालणे सुरूच होते. गिर्यारोहणातून ‘पैसा आणि प्रसिद्धी’ या दोन गोष्टींना त्यांनी दोन हात दूर ठेवले असले तरी दुर्गप्रेमींचे प्रेम भरपूर कमावले. अशा या गिर्यारोहण क्षेत्रातील पितामहाच्या निधनाने संपूर्ण गिर्यारोहण क्षेत्र हेलावले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 7, 2021 12:01 am