पर्यटक वा नागरिकांना सहभागी होता येणार; पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न, पर्यटन मंडळ, पालिकेकडून सहकार्याची अपेक्षा

सायंकाळी अंधार दाटत असताना दररोज होणारी गोदा आरती तशी नाशिककरांची परिचित. बाहेरगावहून येणाऱ्या पर्यटकांना गोदावरीच्या या आरतीविषयी उत्सुकता असते. हरिद्वार, अलाहाबाद या ठिकाणी होणाऱ्या गंगा आरतीला भाविक मोठय़ा संख्येने हजेरी लावत असतात. ही बाब लक्षात घेऊन नाशिकच्या गोदा आरतीचे विपणन करण्याची संकल्पना मांडण्यात आली असून त्यात आता पर्यटक वा नागरिकांना सहभागी होता येणार आहे. वाढदिवस वा तत्सम औचित्य साधून नागरिक व भाविकांना स्वत: गोदा आरती करता येणार आहे. या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आहे.

कुंभमेळ्यातील अखेरचा टप्पा समीप येत असताना ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनने गंगा-गोदावरी पुरोहित संघाच्या सहकार्याने मांडलेल्या या संकल्पनेला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महापालिकेने सहकार्य करावे अशी संयोजकांची अपेक्षा आहे. नागरिकांना आपला वाढदिवस गोदा आरतीने साजरा करता येईल. हरिद्वार, अलाहाबाद अशा काही पवित्र नदीच्या किनाऱ्यावर वर्षभर गंगा आरती होते. त्या आरतीला भाविक, पर्यटक आवर्जुन हजेरी लावतात. अशीच गोदा आरती दररोज सायंकाळी सात वाजता नाशिकमध्ये होते. मात्र, स्थानिकवगळता भाविक व पर्यटकांना त्याबाबत फारशी माहिती नाही. उपरोक्त काळात रामकुंड व सभोवतालच्या मंदिरांमध्ये आलेल्या भाविकांनाच अकस्मात तिची अनुभूती मिळते.

ही बाब लक्षात घेऊन उपरोक्त घटकांनी गोदा आरतीच्या प्रसिद्धीसाठी आपला वाढदिवस गोदा आरतीने साजरा करण्याची संकल्पना मांडली आहे. नागरिक, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, पर्यटक कोणी सामान्य नागरिक आपल्या वाढदिवस गोदा आरती व गोदामाईच्या साक्षीने अविस्मरणीय करू शकतात, असे तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी सांगितले. या निमित्ताने पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे.

नाशिकच्या गोदा आरतीचे वैशिष्टय़ म्हणजे पुरोहित संघ अर्थात स्थानिक पुजाऱ्यांकडून ती केली जाते. हरिद्वार वा अलाहाबादच्या आरती केवळ पाहता येते. तथापि, गोदा आरतीत पर्यटक व भाविकांना स्वत: ती आरती करता येईल. १५ जानेवारीपासून मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर या उपक्रमाचा शुभारंभ होत आहे. पुरोहित संघ मागील पाच ते सहा दशकांपासून अखंडपणे ही आरती करत आहे. शहरातील हॉटेल्समध्ये गोदा आरतीचे माहितीफलक लावण्याचा प्रयत्न केला जाईल. या आरतीत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.