मुक्त विद्यापीठाचा सोमवारी दीक्षांत सोहळा

दरवर्षी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना पुस्तकांची उपलब्धता करावी लागते. वेळेवर पुस्तके न मिळाल्याने अनेकदा विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. सुमारे १२५ अभ्यासक्रमांच्या पुस्तकांची हजारोंच्या संख्येने छपाई करावी लागते. राज्यभरात वितरण करताना दमछाक होते. छपाईवर होणारा मोठा खर्च वेगळाच. या पाश्र्वभूमीवर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आगामी शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देणार असून हळूहळू छपाई कमी करून ई बुक स्वरूपात ती देण्यात येतील. नवीन अभ्यासक्रमांची सर्व पुस्तके ई बुक स्वरुपात दिली जाणार आहेत.

या बाबतची माहिती मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २४ वा दीक्षांत सोहळा सोमवारी दुपारी चार वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी एक लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. हा सोहळा संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर कुलगुरू प्रा. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली होईल. विद्यापीठाच्या १२५ शिक्षणक्रमांना दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रवेश घेतात. संबंधितांना पुस्तके उपलब्ध करण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे. पुस्तकांची निर्मिती, छपाई, वितरण यावर मोठा निधी खर्च होऊन कालापव्ययही होतो. पुस्तक छपाई कमी करून ते ई बुक स्वरूपात देण्याच्या दिशेने पावली टाकली जात आहे. नवीन शिक्षणक्रमांची पुस्तके ई बुक स्वरूपात राहतील, असे वायुनंदन यांनी स्पष्ट केले.

घर, संसार, नोकरी, व्यवसाय सांभाळून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे. मुक्त शिक्षणात महिलांची संख्या वाढत आहे. यंदा पदवी घेणाऱ्यांमध्ये ५५ टक्के पुरुष तर ४५ टक्के महिलांचे प्रमाण आहे. मुक्त विद्यापीठात प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. डिजिटलायझेशनवर लक्ष दिल्यामुळे सर्व अभ्यासक्रमांचे निकाल वेळेत लावणे शक्य झाले. मुक्त विद्यापीठात विद्यार्थी संख्येचा विचार करता मनुष्यबळ अतिशय कमी आहे. त्यात वाढ करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे वायुनंदन यांनी सांगितले. दीक्षांत सोहळ्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाशिक शहरापासून विद्यापीठात येण्यासाठी विद्यापीठाने  बसची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. सीबीएसपासून ही बससेवा उपलब्ध राहील. पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, विद्यार्थी सेवा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश अतकरे उपस्थित होते.

एक लाख ५४ हजार ४४० जणांना पदवी

पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यंदा एक लाख १७ हजार ३६९ पदवी, १५ हजार ६३२ पदविका, १८ हजार ३१३ पदव्युत्तर पदवी, ८४ पदव्युत्तर पदविका, ११ एम. फिल, ३१ पीएच.डीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यातील १३१४ विद्यार्थी हे ६० वर्षांवरील तर २० ते ३९ वयोगटातील एक लाख ३२ हजार आहे.

डॉ. राम ताकवले यांना डी. लिट

या दीक्षांत सोहळ्यात मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांना डी. लिट.ने सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. ताकवले यांनी १९८९ मध्ये दूरशिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना काम करता करता शिक्षण घेता यावे, यासाठी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. यापूर्वी प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनाही डी. लिट. पदवी जाहीर करण्यात आली होती. परंतु, मंगेशकर यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव तिचे वितरण अद्याप करता आलेले नाही. त्यांची प्रकृती चांगली झाल्यावर राजभवनमध्ये राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्या हस्ते विद्यापीठ तिचे वितरण करणार असल्याचे वायुनंदन यांनी सांगितले.