रक्तद्रव्य उपचारासाठी तयारी; रुग्णांकडून अवास्तव देयके वसूल करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मविप्र शिक्षण संस्थेच्या आडगाव स्थित रुग्णालयात ३५०, एसएमबीटी रुग्णालयात १५० आणि बिटको रुग्णालयातील नवीन इमारतीत ४०० खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. रक्तद्रव्य उपचारासाठी त्याचे संकलन करण्याची सूचना नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. जिल्हा रुग्णालयात चाचणीसाठी प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. रुग्णांकडून अवास्तव देयके वसूल करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी पालकमंत्री भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. निखिल सैदाणे आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीत शहरात प्रतिदिन २०० हून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. उपचारासाठी आधी नियोजित केलेली व्यवस्था अपुरी ठरण्याची शक्यता आहे.

यामुळे मविप्र शिक्षण संस्थेचे आडगाव येथील रुग्णालय, एसएमबीटी रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. बिटको रुग्णालयातील नवीन इमारतीत ४०० खाटांची व्यवस्था केली जाणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

करोना रुग्णांवर रक्तद्रव्य उपचार उपयुक्त ठरत आहे. मुंबई, पुण्यात या माध्यमातून बाधितांवर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये हे उपचार सुरू करण्यासाठी रक्तद्रव्य संचलन सुरू करण्यास सांगण्यात आले. काही रुग्णालयात उपकरणांच्या कमरतेच्या तक्रारी होतात. जिथे गरज आहे तिथे तातडीने अद्ययावत उपकरणांची व्यवस्था करावी. मनुष्यबळाचा प्रश्न भेडसावत असून मनुष्यबळाची भरती करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे सूचित करण्यात आले.

निधीची कमतरता नाही

करोना नियंत्रणासाठी निधीची कमतरता नाही. शासनाकडून येणाऱ्या नवीन औषधांचा वापर शासकीय रुग्णालयात प्राधान्याने केला जाईल. मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक आहे. रुग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी रुग्णालयात समन्वयक डॉक्टरांची नेमणूक कराव्यात, असे भुजबळ यांनी सूचित केले. दाट लोकवस्तीच्या काही भागात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. तिथे कडक नियोजन करावे. प्राणवायूच्या टाकीची आवश्यकता आहे, तिथे बसविण्यात येतील. जिल्हा रुग्णालयात प्रयोगशाळा सुरू करण्याचे नियोजन केले जात असून ती लवकरच सुरू होईल. महाराष्ट्राचा विचार करता नाशिकमध्ये मृत्यूदर कमी असून त्यात १२ वा क्रमांक आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या क्रमवारीत नाशिक पाचव्या क्रमांकावर आहे. हा आकडा शून्यावर येईपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल. शाळांकडून शुल्कासाठी केल्या जाणाऱ्या सक्तीबाबत भुजबळ यांनी खासगी शाळांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.