जिल्ह्य़ात करोना रुग्णांची संख्या शंभरी पार गेल्याने आरोग्य विभागासह यंत्रणेवरील ताण वाढला आहे. मालेगावमध्ये रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ कशी थांबविता येईल, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. दुसरीकडे, मंगळवारी सायंकाळी तसेच बुधवारी सकाळी प्राप्त झालेले आठ अहवाल नकारात्मक असून मालेगाव येथील दोन अहवाल सकारात्मक आल्याने जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या १०६ पर्यंत गेली आहे. आरोग्य विभागाने दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्य़ातील पाच तालुक्यांमध्ये करोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहता वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये अधिग्रहित करण्यास सुरूवात केली आहे.

मार्चपासून करोनाचा संसर्ग फैलावण्यास सुरूवात झाली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परदेशवारी केलेल्या तसेच दिल्ली येथील धार्मिक परिषदेला हजेरी लावलेल्या नागरिकांचा शोध घेत त्यांची आरोग्य तपासणी करणे सुरू करण्यात आले होते. ग्रामीण भागातही करोनाचा शिरकाव होऊ लागल्यावर जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करत नागरिकांच्या फिरण्यावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत मालेगावमध्ये ९६, तर नाशिकसह इतर भागात १० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

करोनाग्रस्त रुग्णांचा वाढता आकडा पाहता आरोग्य विभागाने खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये अधिग्रहित करण्यास सुरूवात केली आहे. याअंतर्गत त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ रुग्णालय, चांदवड येथील के. बी. आबड होमिओपॅथी महाविद्यालय, येवला येथील बाभुळगाव परिसरातील आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालय, सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालय आणि देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल अधिग्रहित करण्यात आले आहे. या ठिकाणी पहिल्या टप्पात प्रत्येक रुग्णालयात ५० याप्रमाणे २५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

ही संख्या रुग्ण वाढल्यास १५० पर्यंत नेता येईल, अशी माहिती जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच करोना कक्षप्रमुख डॉ. अनंत पवार यांनी दिली. करोना संशयितांना दाखल करणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्यांच्या आवश्यक तपासण्या करण्यात येणार असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयासह मालेगाव सामान्य रुग्णालय, नाशिक महापालिका रुग्णालयावरील ताण हलका होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नागरिकांनी भीतीमुक्त व्हावे

करोना संशयित किंवा करोनाबाधित रुग्ण जेव्हां उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतो. तेव्हां त्यास आपणास करोना झाला किंवा नाही याचे उत्तर तातडीने  हवे असते. आपल्याला आजार झाला यापेक्षा आपल्यामुळे कुटूंबातील सदस्य, आपल्या संपर्कातील लोक यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात येईल, घरीच बंदिस्त करण्यात येईल, परिसर बंदिस्त होईल अशी भीती रुग्णांच्या मनात असते. यामुळे आजार अंगावर काढण्याचा प्रयत्न होत आहे. रुग्णांनी आपल्या मनातील भीती दूर करावी.

– डॉ. अनंत पवार, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी

१०८ रुग्णवाहिका वरदान

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. प्रत्यक्ष सव्‍‌र्हेक्षणात कोणाला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आशा-अंगणवाडी सेविकांना  आढळली. तसेच सरकारी रुग्णालयात तपासणीत करोना संशयित आढळले. याबाबत १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेशी  संपर्क करत रुग्णांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी माहिती दिली जाते. काही वेळा परिसरातील नागरिकांकडूनही दूरध्वनीवरून माहिती दिली जाते. जिल्ह्य़ात ४६ रुग्णवाहिकेपैकी ११ रुग्णवाहिका या करोनासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षेची साधने, प्रशिक्षण देण्यात आले आहे. आतापर्यंत लोकांकडून १५१, तर सरकारी रुग्णालयांकडून २०४ रुग्णांना करोना उपचार-तपासणीसाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती १०८ रुग्ण सेवेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. अश्विन राघमवर यांनी दिली.