26 February 2021

News Flash

त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची संख्या कमी होणार?

त्र्यंबकसाठी असणाऱ्या मेळा बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे

(संग्रहित छायाचित्र)

* बस स्थानक नूतनीकरणाचा फटका

* पावसाच्या संततधारेचा परिणाम

श्रावणात त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या व्यवस्थेसाठी राज्य परिवहनकडून विशेष ‘बस सेवा’ उपलब्ध करून दिली जाते. परंतु यंदा बस स्थानकाच्या नूतनीकरणामुळे पहिला श्रावणी सोमवार अवघ्या काही तासांवर आलेला असतानाही मंडळाकडून अद्याप नियोजन करण्यात आलेले नाही. त्र्यंबकेश्वर परिसरात असणारी संततधार, पूरसदृश परिस्थितीमुळे भाविकांची संख्या कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

त्र्यंबकसाठी असणाऱ्या मेळा बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. बांधकामामुळे येथील गाडय़ा सध्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून सोडण्यात येत आहेत. श्रावणासाठी गाडय़ांची संख्या वाढविल्यावर मध्यवर्ती बस स्थानकावर ताण येईल. दुसरीकडे, दुसऱ्या सोमवारी बकरी ईद येत असल्याने ईदगाह मैदान बससेवेसाठी मिळणार नाही.

या परिस्थितीचा विचार करता मंडळाकडून बस फेऱ्या, बस स्थानक याची यादी प्रसिद्ध होणे गरजेचे असताना शुक्रवारी सायंकाळपर्यंत मंडळ ईदगाह मैदान कसे मिळविता येईल, या प्रयत्नात राहिले. या सर्वाचा परिणाम भाविकांच्या संख्येवर जाणवण्याची शक्यता आहे.

राज्य परिवहन महामंडळातर्फे दरवर्षी श्रावणातील प्रत्येक सोमवारचे महत्त्व लक्षात घेऊन रविवारी सायंकाळपासून त्र्यंबकसाठी जादा बससेवा सुरू करण्यात येते. प्रशासनाकडून त्र्यंबकच्या अलीकडेच खासगी वाहने थांबविण्यात येतात. राज्य परिवहनच्या बसने अथवा पायी भाविक शहरात दाखल होतात. या काळात मंडळाची इतर दिवसांच्या तुलनेत काही अंशी जादा कमाई होते. यंदा मात्र या उत्पन्नाचा स्रोत आटेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भाविकांची संख्या काही दिवसांपासून रोडावली आहे. श्रावणात ती जास्त कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे श्रावणात दर दिवशी लाखाहून अधिक भाविक गर्दी करतात. भाविकांची गर्दी पाहता त्र्यंबक देवस्थानच्या वतीने यंदा भाविकांच्या सुरक्षेला महत्त्व देत काही बदल करण्याचे ठरविले आहे. दर्शन रांग, सभामंडप, गर्भगृह, मंदिर गाभारा आदी ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. सततच्या पावसामुळे फरशी निसरडी झाल्याने तिच्यावर गालिचा अंधरता येईल का? या अनुषंगाने प्रयत्न सुरू असल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी दिली.

दरम्यान, यंदा देवस्थानची ‘प्रसादालय’ योजना रखडल्याचे चित्र आहे. त्र्यंबकराजाच्या दर्शनानंतर बाहेर पडणाऱ्या भाविकाला तेथेच प्रसाद देता यावा यासाठी देवस्थान नियोजन करत असताना जागेअभावी या उपक्रमाला अडचणी येत

आहेत. यासाठी देवस्थानच्या ‘शिवाप्रसाद’ या इमारतीचा विचार झाला. मात्र नगर परिषदेपर्यंत भाविक पुन्हा जातील का, तेथून प्रसाद घेतील काय, असे प्रश्न उपस्थित होत असल्याने प्रसादाचे नियोजन अद्याप नाही.

ईदगाह मैदानासाठी प्रयत्न

त्र्यंबकेश्वरसाठी नाशिक येथील मध्यवर्ती बस स्थानकातून मागील वर्षांप्रमाणे यंदाही बसेस सोडण्यात येतील. तिसऱ्या श्रावण सोमवारची गर्दी पाहता ईदगाह मैदानाची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप त्याबाबत कुठलीच माहिती मिळाली नाही. तसेच किती बस, किती फेऱ्या मारणार याचे नियोजन अद्याप झालेले नाही. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत नियोजन होईल.

– नितीन मैंद  (विभाग नियंत्रक, नाशिक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 12:15 am

Web Title: number of devotees decrease in trimbakeshwar abn 97
Next Stories
1 नाशिक रेल्वे स्थानकास ‘आयएसओ’ मानांकन
2 चार गावांना लवकरच हक्काचे पाणी
3 मद्यधुंद दुचाकीस्वाराने वाहतूक पोलीसाच्या डोक्यात मारला नारळ
Just Now!
X