राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह एक ते सात सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जात असून याअंतर्गत येथील सह्य़ाद्री रुग्णालयात  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा यंदाचा विषय ‘पहिले हजार दिवस जीवनाचे’ हा आहे.

भारतात कुपोषणामुळे बालकांचे अधिक मृत्यू होतात. बाळ जन्माला येण्याआधीपासून त्याची काळजी घेणे आवश्यक असते. पहिले सहा महिने बाळाला केवळ स्तनपान करावे, सातव्या महिन्यापासून स्तनपानासोबत वरचे अन्न देण्यास सुरुवात करावी. आपल्या बाळाने काय खावे, या संदर्भातील माहिती पालकांनी आहारतज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ पूजा देवरे, धनश्री मोडक यांनी दिला आहे. सह्य़ाद्री रुग्णालयात सप्ताहांतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना आहाराविषयी माहिती देणे, प्रदर्शन, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी पाककला आणि भित्तीचित्र स्पर्धाचे आयोजन यांसह इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी संजय चावला, डॉ. महेश राजेंद्र, लता नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.