मागण्यांसाठी विधानभवनावर धडक

ओबीसी समाजाची जातीनिहाय आकडेवारी जाहीर करून समाजासाठी केंद्रात व राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, या व इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा महामोर्चा विधानभवनावर धडकला. ओबीसी समाजाचे सर्वपक्षीय आमदार आणि खासदार, स्थानिक नेत्यांसह हजारोच्या संख्येने ओबीसी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. प्रथमच सर्वपक्षीय नेते या मोर्चात सहभागी झाले असले तरी प्रत्येक नेत्याने समाजासाठी आपण काय केले हे सांगत असताना आता संघटित होऊन संघर्ष करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांंपासून संघर्ष सुरू आहे. यावर्षी प्रथमच ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते प्राचार्य बबन तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. दीक्षाभूमी येथे समाज बांधव संघटित झाल्यावर दुपारी १२ वाजता मोर्चाने विधानभवनाकडे कूच केले. ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, टी पॉईंटजवळ मोर्चा अडविण्यात आल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसर दुमदुमन गेला.

डोक्यावर पिवळी टोपी, गळ्यात दुपट्टा घाललेले हजारो ओबीसी समाजाचे लोक मोर्चात सहभागी झाले होते.  यावेळी खासदार नाना पटोले, माजी आमदार खुशाल बोपचे, आमदार सुनील केदार, काँग्रेसचे नेते माजी आमदार सेवक वाघाये, आमदार रवी राणा, आमदार बाळू धानोरकर, कांॅग्रेसचे नेते गिरीश पांडव, राष्ट्रवादी काँग्रेसचे ईश्वर बाळबुधे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार आदी विविध पक्षांचे नेते यावेळी मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मोर्चासमोर विविध नेत्यांची भाषणे सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोर्चाला सामोरे आले पाहिजे अशी मागणी करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे समाजाचे नेते मोर्चाला सामोरे आले आणि त्यांनी निवेदन स्वीकरून समाजाला न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

नाना पटोलेंना भोवळ

खासदार नाना पटोले यांचे भाषण सुरू असताना मोर्चातून सरकार तुमचे आहे त्यामुळे समाजाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी होऊ लागली. मोर्चातील कार्यकर्त्यांनी घोषणा देणे सुरू केले. या घोषणा सुरू होतात नाना पटोले यांना भोवळ आली आणि ते व्यासपीठावरून खाली उतरले. डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. मात्र, पटोले काही वेळातच पुन्हा व्यासपीठावर गेले.

जानकारांच्या विरोधात ओबीसी समाजाचा रोष

धनगर समाजाच्या मोर्चातून समाजाचे नेते व राज्याचे पशुसवघर्धन मंत्री महादेव जानकर यांना हाकलून लावण्यात आल्यानंतर गुरुवारी ओबीसी समाजाच्या महामोर्चाला ते सामोरे आले. मोर्चेकऱ्यांनी यावेळी धनगरांना व्यासपीठावर जाऊ नका म्हणून विरोध केला असताना खासदार नाना पटोले त्यांना व्यासपीठावर घेऊन गेले. मी ओबीसी समाजाचा असल्यामुळे समाजाचे दुख काय असते याची जाण मला असल्याचे सांगत त्यांनी समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आयुष्याच्या शेवटपर्यंत लढणार असल्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले. मात्र, भाषण झाल्यावर माजी आमदार सेवक वाघाये आणि त्यापूर्वी काँग्रेसचे नेते गिरीश पांडव जानकरांना विरोध करीत जो मंत्री स्वतला धनगराचा नेता समजतो आणि त्यांचे प्रश्न जर सोडवू शकत नाही तर ओबीसीचे प्रश्न काय सोडवतील, अशी टीका केली. मोर्चेकऱ्यांनी जानकारांच्या विरोधात घोषणा देणे सुरू केले. घोषणा सुरू होताच जानकर व्यासपीठावरून खाली उतरले आणि निघून गेले.

सरकारने सकारात्मक विचार करावा

राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर ओबीसी समाजाचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी त्यावेळी गोपीनाथ मुंडे आणि मी सभागृहात केली होती त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने त्या संदर्भात आता सकारात्मक विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या संदर्भात घोषणा केली होती आणि ते येणाऱ्या दिवसात त्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेऊन समाजाला न्याय मिळवून देतील, असा विश्वास आहे.

खासदार नाना पटोले

स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे

ओबीसी समाज प्रथमच मोठय़ा प्रमाणात संघटित झाला असून सरकारने समाजाची दखल घेत स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले पाहिजे. सर्वपक्षीय नेते या मोर्चात सहभागी झाले असून यापुढे संघटित होऊन सरकारला ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य कराव्या लागतील, अशी परिस्थिती निर्माण करणार आहे. या मोर्चाच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणात समाज संघटित झाला असून यापुढे हा संघर्ष सुरू ठेवणार आहे.

बबन तायवाडे अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ.