अनधिकृत फलक प्रकरण

नाशिक : शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी चौकात उभारलेल्या फलकावरून सत्ताधारी भाजपच्या चार नगरसेवकांविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्याची नाशिक पूर्वच्या विभागीय अधिकाऱ्यांची कार्यपद्धती त्यांना चांगलीच महागात पडली. कोणतीही शहानिशा न करताच संबंधिताने नगरसेवकांची नांवे त्यात समाविष्ट केल्याचा आक्षेप आहे. याचे संतप्त पडसाद मंगळवारी सर्वसाधारण सभेत उमटले. याची गंभीर दखल घेत महापौरांनी अतिरिक्त विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांना तात्काळ निलंबित केले.

प्रदीर्घ काळानंतर होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रारंभीच नाशिक पूर्वचे अतिरिक्त विभागीय अधिकारी धारणकर यांच्या कार्यपद्धतीचा विषय चर्चेत आला. मध्यंतरी सारडा सर्कल चौकात सणोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी फलक उभारला होता. त्या फलकावर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांसह महापौर, काही नगरसेवकांचे छायाचित्र होते. नाशिक पूर्वचे अतिरिक्त विभागीय अधिकारी धारणकर यांनी छायाचित्रांच्या आधारे अनधिकृतपणे फलक उभारल्याप्रकरणी सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, रुपाली निकुळे, शाहिन मिर्झा या भाजपच्या नगरसेवकांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या फलकाबाबत नगरसेवकही अनभिज्ञ होते. तो फलक ज्या भागात उभारलेला आहे, तो भाग त्यांच्या प्रभागातही नव्हता. फलकावर छायाचित्रांचा वापर झाला असला तरी नगरसेवकांचा नामोल्लेख नव्हता. हा फलक कोणी उभारला याची धारणकर यांनी तपासणी केली नाही. काही कार्यकर्त्यांनी फलक उभारल्याचे मान्य केले. पण, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. याचे संतप्त पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. नगरसेविका निकुळे यांनी महापौरांच्या आसनासमोर ठाण मांडून कारवाईची मागणी केली.

फलक उभारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती नगरसेवकांना प्रसारमाध्यमातून समजली. त्या फलकाशी आमचा संबंध नव्हता. अनधिकृत फलक कोणी उभारला याची शहानिशा न करता धारणकर यांनी नगरसेवकांची नावे तक्रारीत समाविष्ट केली. या प्रकाराने नाहक मनस्ताप सहन करावा लागला. लोकप्रतिनिधींचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नगरसेवकांनी केली. त्यास सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने पाठिंबा दिला.

तत्क्षणी निलंबन अन् बाहेरचा रस्ता

धारणकर यांच्यामुळे नगरसेवकांची विनाकारण बदनामी झाली. लोकप्रतिनिधींचा अशा पद्धतीने अवमान करण्याची हिंमत कोणत्याही अधिकाऱ्याने करू नये, अशी तंबी देत त्यांनी धारणकरांना याच मिनिटाला निलंबित करत असल्याचे जाहीर केले. संबंधित गुन्हा मागे घेण्याचे त्यांनी सूचित केले. यावेळी धारणकर सभागृहात होते. महापौरांनी त्यांना तत्काळ सभागृहाबाहेर जाण्याचे निर्देश दिले.