जिल्हा परिषदेतर्फे  विविध शैक्षणिक उपक्रम

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : नेहमीप्रमाणे जून महिन्यात सुरू होणाऱ्या शाळा यंदा करोना महामारीमुळे अद्याप सुरू झालेल्या नाहीत.  शाळा बंद म्हणजे विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होणार का, विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात शिक्षण घेणार का, असे असंख्य प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतावत होते. विद्यार्थ्यांंचे कोणत्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शाळा बंद शिक्षण सुरू उपक्रम हाती घेतला. जिल्हा परिसरात या उपक्र माअंतर्गत एक लाख १२ हजारांहून अधिक विद्यार्थी ऑफलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत.

करोनाकाळात शाळा बंद पण शिक्षण सुरू या अंतर्गत विद्यार्थ्यांंनी घरी राहून शिक्षण घेणे ही संकल्पना राबविण्यासाठी  शासनाने काही संसाधनांची माहिती उपलब्ध करून दिली. ई लर्निगच्या माध्यमातून  मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दूरदर्शनवरील टिली—मिली असे विविध शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांंसाठी सुरू करण्यात आले आहेत. याद्वारे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. ज्या विद्यार्थ्यांंकडे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणारे तांत्रिक साधन उपलब्ध नाही; अशा विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि करोना महामारीच्या काळात ऑनलाइनच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांंना शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी डोनेट अ डिव्हाईस, डोनेट अ बुक, नाशिक विद्यावाहिनी रेडिओ असे उपक्रम जिल्ह्यत राबविले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शिक्षण सभापती सुनीता दराडे, शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी स्वत: शैक्षणिक मदत म्हणून विद्यार्थ्यांंना ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी भ्रमणध्वनी  देऊन उपक्रमाची सुरुवात केली. तसेच नागरिकांनाही मदतीचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांंना ऑनलाइन शिक्षण घेण्याची इच्छा आहे. परंतु, ज्या विद्यार्थ्यांंकडे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी तांत्रिक साधन उपलब्ध नाही ; अशा गरजू विद्यार्थ्यांंना डोनेट अ डिव्हाईस या उपक्रमाच्या माध्यमातून भ्रमणध्वनी, संगणक, टॅब, लॅपटॉप, रेडिओ आणि इतर शैक्षणिक साहित्य मदत म्हणून दान करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी तांत्रिक साधन देणाऱ्या व्यक्तींची माहिती प्राप्त करण्यासाठी जिल्हास्तरावरून संके तस्थळ तयार करण्यात आले. तालुका स्तरावर तीन सदस्यांची समिती  तयार करण्यात आली. जिल्हास्तरावर प्राप्त होणारी तांत्रिक साधने देणाऱ्या व्यक्तींची माहिती तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात येते. त्याद्वारे तालुका स्तरावरील अधिकारी तांत्रिक साधन देणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधून तांत्रिक साधन गरजू विद्यार्थ्यांंपर्यंत शिक्षकांमार्फत देण्याचे कार्य सुरू आहे. या अंतर्गत दानशूर व्यक्तींनी रेडिओ १५५५, कार्यपुस्तिका ५४२, स्मार्ट भ्रमणध्वनी ३६८, पेनड्राईव्ह ३४८, साधा भ्रमणध्वनी २७०, टीव्ही ५३, टॅब ५२, संगणक ४७, लॅपटॉप ११, प्रोजेक्टर पाच आदी साहित्य संकलित करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांंपैकी ९९,८९६ विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. टीव्हीवरील टिली—मिली कार्यक्रम, नाशिक विद्यावाहिनी रेडिओ याव्दारे विद्यार्थ्यांंना ऑनलाइन शिक्षण देण्याचे कार्य नाशिक जिल्ह्यत सुरू आहे. उर्वरित १,१२,३६६ विद्यार्थ्यांंना ऑफलाइनच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत आहे. स्थानिक शिक्षक विद्यार्थ्यांंना प्रत्यक्ष घरोघरी जाऊन शिकवित आहेत.