भडगाव शहरात डेंग्यूसदृश आजाराने ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. शहरातील घाणीच्या साम्राज्याने हा बळी गेल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. येथील सय्यद वाडा भागातील लाकूड व्यावसायिक आसिफ बेग सालार बेग असे या व्यक्तीचे नाव आहे. आठवडाभरापासून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. शहरात घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरलेले आहे. ही बाब डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक ठरली आहे. गांधी जयंतीच्या दिवशी अनेक सेवाभावी संस्था व पालिकेने एकत्रितपणे स्वच्छता मोहीम राबविली. यामुळे स्थिती काहीशी सुधारली असली तरी ओला व सुका कचरा वेगळा करण्याची व्यवस्था नाही. कचराकुंडय़ांची व्यवस्था नसल्याने कचरा उघडय़ावर फेकला जातो.

डासांचे प्रमाण नियंत्रणात राखण्यात आरोग्य विभागाला अपयश येत आहे. सय्यद वाडय़ातील तरुणांनी परिसराची स्वच्छता करण्याची मागणी आरोग्य निरीक्षकांकडे केली होती. त्याच भागात डेंग्यूसदृश आजाराने एकाचे निधन झाल्यामुळे स्थानिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. बस स्थानकासमोरील परिसर, पेठ, टोणगाव, यशवंत नगर, करब, वाडढे भागांत पाणी साचले असून त्या भागाची स्वच्छता करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.