भद्रकाली परिसरातील घटना, दरवर्षी पावसाळ्यात जुने वाडे पडण्याचा धोका कायम 

नाशिक : भद्रकाली परिसरात बुधवारी पहाटे दुमजली जीर्ण वाडय़ाची भिंत लगतच्या लहान घरावर पडून झालेल्या दुर्घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेऊन मदतकार्य राबविल्याने ढिगाऱ्यातून वृद्धास वाचविण्यात यश मिळाले.

जुने नाशिक भागात शेकडो जीर्ण वाडे आहेत. गेल्या वर्षी पावसाळ्यात अनेक वाडय़ांची पडझड झाली होती. यंदाच्या पावसाळ्यात जीर्ण वाडय़ांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मध्यरात्री शहरात पाऊस झाला. पहाटे साडेचारच्या सुमारास भद्रकालीतील जुन्या टॅक्सी थांब्याच्या मागील बाजूला मातंगवाडीत ही दुर्घटना घडली. परिसरात बागूल यांचे दुमजली घर आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या या घराची एका बाजूकडील भिंत पहाटे कोसळली. ती लगतच्या लहान घरावर पडली. या दुर्घटनेत राजंेद्र खराटे (१८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासह ५५ वर्षांची व्यक्ती ढिगाऱ्याखाली दबली गेली. भिंत कोसळण्याच्या आवाजाने झोपेत असणारे रहिवासी खडबडून जागे झाले. काहींनी मदतीसाठी धाव घेतली. पहाटेच्या सुमारास गोंधळ उडाला.

या घटनेची माहिती समजताच अग्निशमन मुख्यालयासह कोणार्कनगर येथील दोन बंबांसह पथके घटनास्थळी पोहोचली. त्यांनी लगेचच मदत कार्य सुरू केले. श्याम राऊत, किशोर पाटील, उदय शिर्के, विजय शिंदे यांनी शर्थीने प्रयत्न करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले.

जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुमजली घर रिक्त करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न केले. परंतु तेथे भाडेतत्वावर वास्तव्यास असणारे कुटुंब या स्थितीतही घर सोडण्यास तयार नसल्याचे नाशिक पश्चिमच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांनी सांगितले.

त्या कुटुंबाची बी. डी. भालेकर हायस्कूलमध्ये तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

जुन्या वाडय़ांचा प्रश्न ऐरणीवर

पावसाळ्यात वाडय़ांची पडझड ही नेहमीची बाब. जुन्या नाशिक परिसरात शेकडो जीर्ण वाडय़ांमध्ये हजारो नागरिक वास्तव्य करतात. पावसाळ्याआधी महापालिका संबंधितांना धोकादायक वाडे रिक्त करण्यासाठी नोटीस बजावून आपले कर्तव्य पार पाडते. तथापि, घरमालक आणि भाडेकरू वादात कोणताही वाडा रिकामा होत नसल्याची स्थिती आहे. नाशिक पश्चिम विभागात ४२५ असे जुने वाडे असून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. ज्या घराची बुधवारी भिंत पडली तो धोकादायकच्या यादीत नसल्याचे विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांनी सांगितले. मागील वर्षी अनेक जुन्या वाडय़ांची पडझड झाली होती. सध्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिकेची यंत्रणा अडकली आहे. पावसाळ्यात जुन्या वाडय़ांची पडझड सुरू झाल्याने दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागणार असल्याची स्थिती आहे.