ओझर येथील घटना

नाशिक : लग्नाला मुलीच्या आई-वडिलांनी परवानगी न दिल्याने माथेफिरूने मुलीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना ओझरच्या दीक्षीजवळील चारी क्रमांक १६ येथे घडली. एकतर्फी प्रेमातून त्याने मुलीकडे लग्नाची मागणी केली. परंतु, तिचे आई-वडील संमती देत नसल्याच्या रागातून त्याने कामावरून घरी परतत असतांना तिला गाठून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने संशयितास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयित सागर प्रभाकर गायकवाड हा शिलेदार वाडीतील मुलीवर प्रेम करायचा. त्याने तिच्या आई-वडिलांकडे लग्नाची मागणीही केली. परंतु, त्यांनी लग्नासाठी संमती दिली नाही. त्याचा राग मनात धरून त्याने हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. संबंधित मुलगी आई वडिलांसोबत मजुरीसाठी रत्नाकर कदम यांच्या मळयात गेली होती. सायंकाळी कामावरून सुट्टी झाल्याने ती पुढे आणि आई-वडील काही अंतराने पायी निघाले असता संशयिताने मुलगी एकटी असल्याचे पाहून गंगापूर डावा तट कालवा चारी क्रमांक १६ जवळ तिला गाठले. काही कळण्याच्या आत धारदार शस्त्राने तिच्या पोटात, पाठीवर वार केले. ती खाली पडली असता तिचा मृत्यू झाल्याचे समजून सागरने पळ काढला. थेट पोलीस ठाणे गाठून त्याने सर्व प्रकार कथन केला.

दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या मुलीच्या आई-वडिलांनी जखमी अवस्थेतील मुलीला पाहून आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. तिला प्राथमिक उपचारासाठी सायखेडा फाटय़ावरील रुग्णालयात नेण्यात आले. नंतर तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी जखमी मुलीची चौकशी केली. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सागर गायकवाडला अटक करण्यात आली असून पिंपळगांव बसवंत न्यायालयात त्याला हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली.