News Flash

आवर्तनात एक हजार दशलक्ष घनफूट पाणी वाया जाणार

इच्छित स्थळ गाठण्यास नदीपात्र आणि नंतर कालव्यातून पाण्याचा १५० ते १९० किलोमीटर प्रवास होईल

दुष्काळात तेरावा महिना

अनिकेत साठे, नाशिक

नाशिकसह नगरमधील जवळपास ८० हून अधिक पाणीपुरवठा योजनांची तहान भागविण्यासाठी चार धरणांमधून सोडलेल्या आवर्तनात शुष्क नदीपात्र, बाष्पीभवन यामुळे ऐन दुष्काळात तब्बल एक हजार दशलक्ष घनफूट पाणी  वाया जाणार आहे.

गंगापूर, मुकणे, दारणा, वालदेवी या धरणांमधून सध्या हा विसर्ग सुरू आहे. इच्छित स्थळ गाठण्यास नदीपात्र आणि नंतर कालव्यातून पाण्याचा १५० ते १९० किलोमीटर प्रवास होईल. कोरडय़ाठाक पात्रातून पाणी मार्गस्थ होताना गृहीत धरलेला व्यय आणखी वाढू नये याकरिता पाटबंधारे विभागाची कसरत सुरू आहे.

धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये सध्या तब्बल २२१ गावे आणि ७९८ वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी १०० पेक्षा अधिक विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर जलस्रोतांतून चोरी होऊ नये, म्हणून त्यांची राखणदारी करण्याची वेळ आली आहे. राहता, कोपरगाव, शिर्डी, पुणतांबा, वैजापूर आदी भागांतील पाणीपुरवठा योजनाही त्यास अपवाद राहिल्या नाहीत. उजव्या कालव्यावर ५२, डाव्या कालव्यावर २४, नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यावर १२, चेहेडी बंधाऱ्यावर ११ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यांच्यासाठी गंगापूर, मुकणे, दारणा, वालदेवी या धरणांतून १६०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. याद्वारे एकूण २१०० दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाईल. त्यातील निम्मे म्हणजे एक हजार दशलक्ष घनफूट पाणी उपरोक्त ठिकाणी पोहोचेल, असा खुद्द पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. म्हणजेच या आवर्तनात निम्म्या म्हणजे एक हजार दशलक्ष घनफूट पाण्याचे नुकसान होणार आहे.

वहन व्यय टाळण्यासाठी जलवाहिनी एक पर्याय आहे. तशी व्यवस्था नसल्याने नदी, कालव्यातून पाणी देण्याचा एकमेव पर्याय आहे. नगर जिल्ह्य़ातील शिर्डी, राहता, कोपरगाव, पुणतांबा आदींचा पाणीपुरवठा या आवर्तनावर विसंबून आहेत. मोठय़ा लोकसंख्येच्या भागात टँकरने पाणीपुरवठा करता येत नाही. या स्थितीत वहन व्यय सहन करण्याशिवाय कोणतेही गत्यंतर नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

वहन व्यय हिशेब

सध्याचे आवर्तन सोडताना पाटबंधारे विभागाने ५० टक्के वहन व्यय गृहीत धरलेले आहे. याअंतर्गत सर्व धरणांतून २१०० दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाईल. त्यातील निम्मे म्हणजे १००० ते ११०० दशलक्ष घनफूट पाणी उपरोक्त स्थळी पोहोचेल, असा अंदाज आहे. म्हणजे एक हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा व्यय होणार आहे. दीडशेहून अधिक किलोमीटरच्या पाण्याच्या प्रवासात वहन व्यय वाढू नये म्हणून पाणीचोरी रोखण्यासाठी गस्ती पथके, काठालगतच्या गावांमधील वीजपुरवठा खंडित करणे आदी उपाय योजण्यात आले आहेत.

यंदाच्या दुष्काळात पात्रात जे काही थोडेफार पाणी होते, तेदेखील काठावरील शेतीसाठी आधीच वापरले गेले. त्यामुळे नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने वहन व्यय वाढला. धरणांतून सोडलेले पाणी ७० ते ८० किलोमीटर पात्रातून प्रवास करते. नंतर डाव्या कालव्यातून ९० किलोमीटर तर उजव्या कालव्यातून ११० किलोमीटरचा प्रवास होतो. या अंतराचा विचार करता वहन व्यय वाढू नये म्हणून आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे.

– नाशिक पाटबंधारे विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2019 4:07 am

Web Title: one thousand million cubic feet of water will be wasted in famine
Next Stories
1 भुसावळ-नाशिक मार्गावर पॅसेंजरऐवजी मेमू लोकल धावणार
2 नाशिकमध्ये पिण्याचे पाणी चोरीला, चोराला शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान
3 नाशिक शहरात आजपासून हेल्मेटसक्ती, विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय
Just Now!
X