शहरासह जिल्हय़ात गणेशोत्सवाची धूम सुरू असून सोळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ४४९ सार्वजनिक गणेश मंडळांनी ’श्रीं’च्या मूर्तीची स्थापना केली आहे, तर ७४ गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ या संकल्पनेवर आधारित एक सार्वजनिक गणपती बसविण्यात आले आहे.  पावसाअभावी यंदा दुष्काळाचे सावट असले तरी गणेशभक्त आणि मंडळांचा उत्साह कायम आहे. सार्वजनिक मंडळांनी गणपतीची स्थापना करीत आरास, देखावे सादर केले आहेत. ते पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे. काही मोठय़ा मंडळांनी यंदा आरासवरील खर्च कमी केला असला तरी इतर समाजोपयोगी कार्यक्रमांवर भर दिला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणपती स्थापनेसह कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी पोलीस प्रशासनासह इतरही अनेक विभागांची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी मंडळ नोंदणीकृत असणे गरजेचे असते. त्यात धुळे जिल्हय़ातील धुळे शहर, आझादनगर, देवपूर, पश्चिम देवपूर, मोहाडी, धुळे तालुका, सोनगीर, साक्री, पिंपळनेर, निजामपूर, दोंडाईचा, शिंदखेडा, नरडाणा, शिरपूर शहर, शिरपूर तालुका, थाळनेर आदी सोळा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत यंदा ४४९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यात मंडळांची सर्वाधिक नोंदणी शिरपूर शहरात ८५ करण्यात आली आहे. त्या खालोखाल धुळे शहरात ५५ आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जात आहे तर सर्वात कमी नोंदणी पिंपळनेर आणि शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आहे.

या ठिकाणी केवळ नऊ सार्वजनिक मंडळे आहेत. गत वर्षांच्या तुलनेत यात घट झाली आहे. गतवर्षी सातशे मंडळांची नोंदणी पोलिसांकडे करण्यात आली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक मंडळांनी यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला.

गावात सर्व जाती-धर्मीयांमध्ये एकोपा निर्माण व्हावा, पोलीस प्रशासनावरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने शासनामार्फत ‘एक गाव-एक गणपती’ उपक्रम राबविला जातो. गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला अनेक गावांत प्रतिसाद मिळाला आहे. यंदाही जिल्हाभरातील ७४ गावांमध्ये एक गाव-एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक १७ गावांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे.