‘नाफेड’तर्फे  खरेदी करणाऱ्या संस्थेच्या सहभागावर आक्षेप; लासलगाव बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या दबावतंत्रामुळे उत्पादकांची कोंडी

नाशिक : कांद्याची सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत गुरूवारी पुन्हा एकदा व्यापारी वर्गाच्या सद्दीचा फटका उत्पादकांना बसला. नाफेडच्यावतीने कृषी साधना शेतमाल उत्पादक सहकारी संस्थेने लिलावात सहभाग घेतल्याच्या निषेधार्थ व्यापारी वर्गाने लिलावावर बहिष्कार टाकला. घाऊक बाजारात थेट लिलावात नव्याने कुणाला सहभागी होता येणार नाही, असे सांगत व्यापारी संघटनेने मात्र नाफेडच्या खरेदीला विरोध नसल्याचे स्पष्ट के ले. या गोंधळात दोन तास लिलाव बंद राहिले. अखेर व्यापारी संघटना, बाजार समितीची बैठक होऊन संबंधित संस्थेला कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आली. नंतर लिलाव सुरू झाले. पण पावसाने त्यात व्यत्यय आणला.

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा व्यापाऱ्यांचे वर्चस्व आहे. खरेतर बाजार समितीने ज्याला परवाना दिला तो मालाची खरेदी-विक्री करू शकतो. तथापि, कांदा व्यवहारात स्थानिक व्यापारी संघटना सभासदाशिवाय अन्य व्यक्तीला शिरकाव करू देत नाही. तसा कुणी प्रयत्न केला तर लिलावातून अंग काढून दबावतंत्राचे प्रयोग आजवर अनेकदा झाले आहेत. त्याची पुनरावृत्ती गुरूवारी पुन्हा एकदा झाली. केंद्र सरकारच्या कांदा स्थिरीकरण निधी अंतर्गत नाफेड खुल्या बाजारातून दरवर्षी कांद्याची खरेदी करते. देशांतर्गत दरवाढ झाल्यास नाफेडकडील कांदा ग्राहकांना उपलब्ध केला जातो. घाऊक बाजारातून कांदा खरेदीसाठी नाफेडने कृषी साधना शेतमाल उत्पादक सहकारी संस्थेवर जबाबदारी सोपविली आहे. या संस्थेच्या प्रतिनिधींनी लिलावात बोली लावल्यानंतर लासलगाव बाजार समितीतील व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. त्यांनी लिलाव बंद केले. काही व्यापारी बोली अर्धवट सोडून निघून गेले.

बाजार समितीत सकाळीच शेकडो वाहनांमधून सुमारे १५ हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आलेला होता. व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्याने लिलाव ठप्प झाले. असे यापूर्वी अनेकदा घडलेले आहे. या प्रकाराने शेतकरी संतप्त झाले. व्यापारी, बाजार समितीच्या कार्यपध्दतीविषयी त्यांनी रोष प्रगट केला. लिलाव बंद झाल्याची माहिती मिळताच बाजार समितीने व्यापाऱ्यांची बैठक बोलावली. नाफेडमार्फत खरेदी करणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले. नाफेडने कांदा खरेदीबाबत दिलेले अधिकृत पत्र सादर करण्याची मागणी करण्यात आली. ही कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित संस्थेला लिलावात सहभागी होऊ द्यावे, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली. बाजार समितीने सहकारी संस्थेला ती कागदपत्र सादर करण्याची सूचना केल्यावर दोन तासानंतर व्यापारी लिलावास राजी झाले. या काळात उत्पादकांना नाहक तिष्ठत रहावे लागले. दुपारनंतर पावसाला सुरूवात झाल्यामुळे काही काळ लिलाव बंद होते. बाजार समितीत १४ हजार ७७८ क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास किमान ७००, कमाल २१३१, तर सरासरी १८०० रूपये भाव मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

नाफेडला माल खरेदी करायला आमचा विरोध नाही. पण माल खरेदी करण्याबाबतचे अधिकृत पत्र संबंधित संस्थेला सादर करता आले नाही. त्यामुळे काही काळ लिलाव बंद राहिले. बैठकीनंतर ते पूर्ववत झाले. लासलगाव बाजारात व्यापारी संघटनेचे सभासद दैनंदिन काम करतात. नवीन कुणी आला तर थेट लिलावात सहभागी होऊ शकत नाही. ज्यांची इच्छा असेल त्याला दोन, तीन वर्ष सभासद व्यापाऱ्याकडे उपव्यापारी म्हणून काम करावे लागते. कुणी बाजार समितीत येईल आणि लिलावात सहभागी होईल हे शक्य नाही. आम्ही तीन, चार पिढय़ांपासून इथे काम करतो. तेजी-मंदीत बाराही महिने काम केले जाते.

– नंदुशेठ डागा (प्रमुख, लासलगाव कांदा व्यापारी संघटना)

नाफेडमार्फत त्रयस्थ संस्था, व्यक्ती लिलावात सहभागी झाली. त्यास व्यापाऱ्यांनी आक्षेप घेत लिलावावर बहिष्कार टाकला. संबंधित संस्थेने कागदपत्रे सादर केलेली नव्हती. या संदर्भात बैठक होऊन दोन तासानंतर लिलाव पूर्ववत झाले.

– सुवर्णा जगताप (सभापती, लासलगाव बाजार समिती)