नाशिक : कांदा व्यापाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे कांदा लिलाव पाडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार नामपूर बाजार समितीत घडला. बाहेर तालुक्यातील व्यापाऱ्याला परवाना दिल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी थेट लिलाव बंद पाडून बहिष्कार अस्त्र उगारले. यामुळे सोमवारी कांदा लिलाव बंद होते. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून संबंधित व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या आठवडय़ात कांदा साठा करण्याची मर्यादा लागू केल्याने व्यापाऱ्यांनी लिलावातून अंग काढून घेतले होते. साठवलेल्या कांद्याचे दोन पैसे मिळू लागले असताना लिलाव बंद झाल्यामुळे कांद्याचे नुकसान झाले. यामुळे आधीच कांदा बाजारात दोलायमान स्थिती असताना सोमवारी नामपूर, सटाणा बाजार समिती आवारात कांदा लिलाव सुरू करण्यात आले. मात्र नामपूर बाजार समितीत लाल कांद्याचे लिलाव संपल्यानंतर तासाभरातच अचानक स्थानिक व्यापाऱ्यांनी लिलावावर बहिष्कार टाकून पुकारा बंद

पाडला. स्थानिक व्यापाऱ्यांसोबत या दिवशी मालेगावचे कांदा व्यापारी झहीर अहमद हेदेखील कांदा लिलावात उतरल्याने खरेदीत स्पर्धा वाढली होती. मात्र लाल कांद्याचा लिलाव झाल्यानंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी नामपूर बाजार समिती प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

दुसऱ्या तालुक्यातील व्यापाऱ्याला परवाना कसा दिला, असा प्रश्न केला. जोपर्यंत बाहेरील तालुक्यातील व्यापाऱ्याचा परवाना रद्द करत नाही, तोपर्यंत लिलावात सहभागी होणार नाही, अशी भूमिका संबंधितांनी घेतली. कांदा लिलाव सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्यानंतर सभापती संजय भामरे, उपसभापती चारुशीला बोरसे यांनी सहायक निबंधक महेश भडांगे यांना पाचारण केले. भडांगे यांच्या आदेशानंतर व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. चर्चेसाठी बोलावूनही व्यापारी फिरकले नाहीत.

लाल कांद्याची आवक वाढली

नामपूर बाजार समितीत सोमवारी तब्बल ८० ते ९० वाहने लाल कांदा आला होता. धुळे जिल्ह्य़ातील साक्री तालुक्यातून सर्वाधिक लाल कांद्याची आवक होती. त्यास सरासरी ४१०० रुपये भाव मिळाला. लाल कांद्याचे लिलाव संपल्यानंतर उन्हाळ कांद्याच्या लिलावाची वेळ येताच व्यापाऱ्यांनी लिलावावर  बहिष्कार टाकल्याने त्यांच्या कार्यपद्धतीविषयी उलटसुलट चर्चा होत आहे.