28 September 2020

News Flash

पंतप्रधानांच्या सभेत कांद्याला बंदी

महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळी कांद्याचा विषय ऐरणीवर आला आहे.

अनिकेत साठे, नाशिक

कांद्याच्या कोंडीने शेतकरी वर्गात संताप खदखदत असून त्याचा भडका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारच्या सभेत उडू नये आणि कांदा हे निषेधाचे हत्यार ठरू नये यासाठी या सभेत कांदा वा अन्य शेतमालाशी संबंधित वस्तूच नव्हे, तर पिशव्यादेखील आणण्यास मनाई करण्यात आली आहे.

देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर उंचावत असताना केंद्र सरकारने निर्यातीवर निर्बंध आणत पाकिस्तान, चीन अथवा इतर देशातून तो आयात करण्याची तयारी केल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष आहे. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेवरही या असंतोषाचे सावट दिसून आले. या यात्रेचा समारोप गुरुवारी मोदी यांच्या सभेने होत असून त्यात कांद्याने राजकीय अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा सर्वतोपरी काळजी घेत आहे.

त्यामुळे तपोवनातील साधुग्राम मैदानावर होत असलेल्या या सभेच्या पाश्र्वभूमीवर, शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पोलीस महासंचालक जातीने सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. कांद्याबाबत केंद्राने स्वीकारलेले धोरण, शेतकरी आत्महत्या आदी मुद्दय़ांवरून रस्त्यावर उतरण्याचा इशारा परिवर्तनवादी युवा संघटनांनी दिला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा दौरा असल्याने पोलिसांनी आंदोलन करू पाहणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. सहा वर्षांपूर्वी मोदी यांची तपोवन येथे सभा झाली होती. त्यावेळी कांदा प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना बुधवारी सकाळीच ताब्यात घेण्यात आले. मनसेच्या कार्यकर्त्यांवरही नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या रोड शो दरम्यान राष्टवादीच्या महिलांनी काळे झेंडे दाखविले.

काही वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ग्रामीण भागांतील एका सभेत ‘कांदा फेक’ आंदोलन झाले होते. महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळी कांद्याचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जाहीर सभेत कोणतेही आंदोलन होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे.

सभास्थळी अडीच हजारहून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात असतील. सभेत येणाऱ्या प्रत्येकाची प्रवेशद्वारावर आधुनिक उपकरणाद्वारे तपासणी होईल. नागरिकांना भ्रमणध्वनी वगळता कोणतीही वस्तू बरोबर बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधानांच्या निफाड येथील सभेत काळे कपडे परिधान करणाऱ्यांना प्रवेश नाकारला गेला होता. यावेळी त्याची पुनरावृत्ती होणार असल्याचे संकेत यंत्रणेकडून मिळत आहेत.

कांदा उत्पादकांची तक्रार

देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्याने कांद्यास सध्या क्विंटलला साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे. एक-दोन वर्षांत प्रथमच कांद्यास चांगला भाव मिळत असताना निर्यात रोखली गेली असून भाव पाडण्यासाठी आयातीचे पाऊल उचलण्यात आल्याची उत्पादकांची तक्रार आहे.

आज मद्यविक्री बंद

नाशिक  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरूवारी पंचवटीतील तपोवनात जाहीर सभा होणार आहे. यानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा पोहचू नये, यासाठी गुरुवारी सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 3:05 am

Web Title: onion banned in pm narendra modi rally zws 70
Next Stories
1 महाजनादेश यात्रेनंतर लगेच विजय यात्रा!
2 दिमाखदार ‘रोड शो’ साठी नेते-कार्यकर्त्यांची लगबग
3 आंदोलन, निदर्शने होऊ नयेत म्हणून पोलिसांची दक्षता
Just Now!
X