तालुक्यातील कांदा उत्पादकाने गळफास घेतल्याने आंबेगाव येथे खळबळ उडाली आहे. कांदा पिकास पाणी देण्यासाठी त्यांनी शेतात बोअर केले, पण त्यास पाणीच लागले नाही. नव्याने हे काम करण्यास पैसे नसल्याने आणि पीकही हातचे जाण्याची स्थिती झाल्यामुळे संबंधिताने आत्महत्येचा मार्ग अनुसरल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दुष्काळी स्थितीत पिकांना वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम करत असल्याचे दिसून येत आहे.
बाळू आव्हाड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले असा परिवार आहे. आव्हाड यांनी शेतात कांद्याची लागवड केली होती. सध्याच्या दुष्काळी स्थितीमुळे सर्वत्र टंचाईच्या झळा बसत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन आव्हाड यांनी पिकास पाणी देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी बोअरवेल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बोअरवेल केले. परंतु, त्यास पाणी लागले नाही. पुन्हा बोअरवेल करण्यासाठी पैसे नाही आणि आधीच्या कर्जाऊ रकमेची परतफेड कशी करावी अशी विवंचना निर्माण झाली. या वैफल्यग्रस्त अवस्थेत त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दुष्काळामुळे ग्रामीण भागात टँकरची संख्या वाढत असून पिण्याच्या पाण्याची भ्रांत असताना शेतीला पाणी कुठून उपलब्ध होईल, हा प्रश्न आहे. ही बाब आधीच गारपीट, नापिकी व शेतमालास मिळणारा अत्यल्प भाव यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला सतावणारी ठरली आहे. काही ठिकाणी टँकरने पाणी आणून पिके वाचविण्याचा प्रयत्न होतो. दुष्काळामुळे टँकरच्या पाण्याला सुगीचे दिवस आले आहे. त्यांचे दर परवडणारे नसल्याने सर्वसामान्य त्याचा विचारही करत नाही. मेहनतीने लागवड केलेले पीक पाण्याअभावी करपण्याची धास्ती शेतकऱ्यांना वाटत आहे.