07 March 2021

News Flash

नवीन उन्हाळ कांद्याचे दरही जेमतेमच

लवकर समाधानकारक दर मिळणे अवघड

( संग्रहीत छायाचित्र )

वर्षभरापासून दोलायमान अवस्थेत असणाऱ्या कांद्याची मातीमोल भावात विक्री होत असताना नवीन उन्हाळ कांद्याचेही बाजारात आगमन झाले आहे. लाल कांद्याला संपूर्ण हंगामात जेमतेम दर मिळाले. साठवणुकीची क्षमता असणाऱ्या उन्हाळ कांद्याची सध्या केवळ प्रति क्विंटल ५८० रुपये दराने विक्री होत आहे. निर्यातीत वाढ होऊनही भावाने उठाव घेतला नाही. घाऊक बाजारातील ही स्थिती लवकर बदलण्याची शक्यता नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

गतवर्षी दुष्काळामुळे बहुतांश शेतकरी कांदा लागवडीकडे वळले. परंतु विपुल उत्पादनामुळे सर्वाचे हात पोळले गेले. उन्हाळ कांद्यातून हजारो शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. या एकंदर स्थितीत नवीन उन्हाळ कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. खरीप व लेट खरीपचे (लाल) दर देखील २०० ते ६०० रुपयांदरम्यान सीमित राहिले. बाजारात माल नेण्याचा खर्च परवडत नसल्याने येवला तालुक्यात एका शेतकऱ्याने वैतागून शेतातील उभे पीक पेटविले होते. या वातावरणात बाजारात येणाऱ्या उन्हाळ आणि संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेल्या लाल कांद्याच्या दरात केवळ शंभर-दीडशे रुपयांची तफावत आहे. उन्हाळ कांद्याचे आयुर्मान अधिक असते. त्यामुळे त्याची साठवणूक करून समाधानकारक दराची प्रतीक्षाही करता येते. तथापि मागील वर्षी अशी साठवणूक करणाऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले. चार ते पाच महिने साठवूनही दर मिळाले नाहीत. साठवणुकीत बराचसा माल खराब होऊन वजन कमी झाले. यामुळे साठवणुकीचा धोका कोण पत्करणार, हादेखील प्रश्न आहे.

जिल्ह्य़ातील काही भाग दुष्काळी आहे. तिथे कांदा लागवडीशिवाय पर्याय नसतो. चांदवड हा त्यापैकीच एक तालुका. या भागातील बाळू आहेर यांनी शेतातील उन्हाळ कांदा नुकताच काढला. साठवणूक करूनही पुढील काळात भाव वाढतील याची शाश्वती नाही. त्यामुळे सध्याच्या दरात सुधारणा झाल्यास माल विक्री करणार असल्याचे ते सांगतात. मागील वर्षीच्या अनुभवामुळे बहुतेकांनी हे धोरण ठेवल्यास जादा माल बाजारात येऊन दर खाली जाऊ शकतात. मध्यंतरी रेल्वे व्ॉगन उपलब्ध नसल्याने देशांतर्गत बाजारात कांदा पाठविणे अवघड झाले होते. त्याचा परिणाम दर घसरण्यात झाला. रेल्वे व्ॉगनचा प्रश्न सुटल्यानंतर दर काही अंशी स्थिर झाले. केंद्र सरकारने निर्यातीसाठी दिलेल्या अनुदानामुळे निर्यात वाढली. वर्षभरातील एकूण निर्यातीचा आकडा सुमारे २५ लाख मेट्रिक टनपर्यंत पोहोचला. मुबलक उत्पादन झाल्यामुळे इतकी निर्यात होऊनही स्थानिक पातळीवर अपेक्षित दर मिळाले नाहीत. उत्पादन खर्च भरून निघण्यासाठी क्विंटलला किमान हजार ते बाराशे रुपयांहून अधिक दर मिळणे गरजेचे असल्याकडे शेतकरी लक्ष वेधतात.

लवकर समाधानकारक दर मिळणे अवघड

गतवर्षीच्या धसक्याने यंदा काही शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा लागवडीपासून दूर राहणे पसंत केले. परंतु चांगले पर्जन्यमान, हवामान यामुळे कांदा उत्पादन मुबलक होईल. यामुळे दर लवकर वाढणार नाहीत. मागणी व पुरवठा यावर दर निश्चित होतात. मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाल्यास दर वाढतात. केंद्र सरकारने निर्यातीसाठी दिलेल्या पाच टक्के अनुदानाची मुदत ३१ मार्च रोजी संपुष्टात आली. ही मुदत ऑक्टोबपर्यंत वाढविणे गरजेचे आहे. ती न वाढविल्यास निर्यातीवर परिणाम होईल. निर्यात वाढल्याशिवाय कांद्याला चांगला भाव मिळणे अवघड आहे. उन्हाळ कांद्याचे आयुर्मान अधिक असल्याने तो साठविता येतो. समाधानकारक दर न मिळाल्यास शेतकरी तो कांदा चाळीत साठवून ठेवतील.  चांगदेवराव होळकर (माजी उपाध्यक्ष, नाफेड)

तुटपुंज्या अनुदानासाठी खेटे

गडगडणाऱ्या भावामुळे गतवर्षी राज्य शासनाने प्रति क्विंटल १०० रुपये जाहीर केलेले अनुदान या वर्षीचा उन्हाळ कांदा बाजारात येण्यास सुरुवात होऊनही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. या अनुदानासाठी शेतकऱ्यांना बँक खाती उघडण्यास सांगण्यात आले. सात-बारा उतारे मागविले. कांदा विक्री व वजन काटा पावती, खाते उतारा तत्सम कागदपत्रे बाजार समितीमार्फत संकलित करण्यात आले. त्यास सात महिने उलटूनही अनुदानाचे पैसे शासनाने दिले नाहीत. वास्तविक अतिशय तुटपुंजे अनुदान असूनही शासनाने ते दिले नाही. त्यामुळे शेतकरी बाजार समितीकडे वारंवार विचारणा करून वैतागले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याला तुलनेत बऱ्यापैकी भाव मिळेल.  जयदत्त होळकर (सभापती, लासलगाव बाजार समिती)

 

देशातील कांद्याची स्थिती (२०१६-१७)

  • २०१६-१७ मधील उत्पादन – १,९७,१३,००० मेट्रिक टन
  • निर्यात – मार्च २०१७ पर्यंत – अंदाजे २५ लाख मेट्रिक टन
  • देशातील एकूण कांदा वापर – १,७७,०२,०१७ मेट्रिक टन
  • शिल्लक राहणारा कांदा – ४७,९७,५०९ मेट्रिक टन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 1:24 am

Web Title: onion farming in maharashtra marathi articles
Next Stories
1 ‘स्मार्ट सिटी’ अभियानातंर्गत ‘सायकल शेअरिंग’ प्रकल्प लवकरच नाशिककरांच्या भेटीस
2 सावधान ! वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास परवाने होणार निलंबित
3 पर्यटकांच्या मदतीसाठी पोलीस पथक तैनात
Just Now!
X