News Flash

लासलगावमध्ये ‘कांदा हब’

शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची आशा

सदाभाऊ खोत यांची घोषणा; शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची आशा

संपूर्ण देशाची कांद्याची गरज भागविण्याचे काम करणाऱ्या नाशिक जिल्ह्य़ातील कांदा उत्पादकांच्या सोयीसाठी लासलगाव येथे कांदा ‘हब’ उभारण्यात येईल, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांनी केली आहे.

निफाड तालुक्यातील विंचूर येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीमध्ये गुरुवारपासून कांदा लिलावास खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी खोत यांनी लासलगावच्या कांदा हबसाठी राज्य शासन केंद्राचे कृषी मंत्रालय व रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करत असून या हबचा शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात फायदा होईल, असा आशावाद व्यक्त केला. कांद्याच्या दरात होणारी चढ-उतार पाहता शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी कांदा साठवणुकीची योग्य व्यवस्था होण्याकरिता शासन उपाययोजना करीत आहे. सध्या कांद्याला चांगला भाव असून तो तसाच मिळावा यासाठी केंद्र सरकारने सद्याचे आयात-निर्यात धोरण बदलू नये व कांदा साठवणुकीवर बंदी आणू नये असे सुचविण्यात आले असल्याचेही खोत यांनी नमूद केले.

शेतकरी हिताची जपवणूक करण्यासाठी सोयाबीनवर आयात कर वाढविण्यात आला असून हमी भावाने ७५ लाख टन तूर खरेदी करण्यात आली आहे. त्यासाठी बाहेरून आयात होणाऱ्या उडीदवरील आयात कमाल मर्यादा तीन लाख टनांवर आणण्यात आली. तूर डाळीवर दोन लाख टन आयातीचे बंधन घातले गेल्यामुळे सोयाबीनचा भाव सहा हजार रुपये प्रतिक्विंटल, उडीद ६४०० प्रतिक्विंटल झाले आहेत. शेतकऱ्यांना अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी या वर्षी नाशिक जिल्ह्यात १५ कोटी २८ लाख अनुदान व मागील प्रलंबित अनुदान देण्यासाठी ३२ कोटी रुपये देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देण्यासाठी राज्याने कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली असून जुलैपासून आयोगाने काम सुरू केले असल्याची माहिती दिली. नाशवंत मालाला हमी भाव देण्यासाठी पणन विभागाच्या अंतर्गत समिती स्थापन करण्यात येत आहे. कांद्यालाही हमी भाव देण्याबाबतचा निर्णय सहा महिन्यात घेतला जाईल. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्राकडे पाठपुरावा केला जात असल्याचे पटेल यांनी सांगितले.

यावेळी आमदार अनिल कदम, लासलगाव कृषी उत्पन्न समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती सुरेश कराड, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर आदी उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमाआधी सदाभाऊ खोत यांनी चितेगाव येथील राष्ट्रीय फलोत्पादन व संशोधन संस्थेस भेट देऊन कांदा व लसूणविषयी करण्यात येत असलेल्या संशोधनाची माहिती घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 1:19 am

Web Title: onion hub in nashik
Next Stories
1 आरोग्य विभागाची महापौरांकडून झाडाझडती
2 सातपूरमध्ये पोलिसांना धक्काबुक्की
3 अकस्मात ‘ब्रेक’चा प्रवाशांना फटका
Just Now!
X