21 January 2021

News Flash

कांदा व्यापाऱ्यांचा परवाने परत करण्याचा निर्णय

व्यापाऱ्यांच्या पवित्र्यामुळे बाजार समित्यांच्या संचालक मंडळातही अस्वस्थता पसरली आहे.

नाशिक बाजार समितीत व्यवहार सुरळीत होत असले तरी शुक्रवारी आवक कमी राहिली.

 

बाजार समित्यांच्या गोटात अस्वस्थता

जिल्ह्य़ातील भाजीपाल्याचे व्यवहार सुरळीत होत असतानाच कांदा, धान्य, बेदाणा, टोमॅटो याची खरेदी करणाऱ्या जिल्ह्य़ातील एक हजार व्यापाऱ्यांनी शनिवारी बाजार समित्यांचे परवाने परत करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषिमालाच्या लिलावावर बहिष्कार टाकल्याने बाजार समित्यांनी संबंधितांना परवाने रद्द करण्याची नोटीस बजावली होती. शासनाने कृषिमाल नियमनमुक्त केलेला आहे. बाजार समितीत अडत व तत्सम खर्चामुळे खरेदी तुलनेत महाग पडते. नव्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांवर माल कोठून खरेदी करावा, याचे बंधन राहिलेले नाही. त्यामुळे बाजार समितीचे परवाने परत करण्याचा पवित्रा संबंधितांनी घेत नवीन दबावतंत्र अवलंबले आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील बाजार समिती सभापतींची तातडीने बैठक पार पडली. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी रविवारी दुपारी तीन वाजता जिल्ह्य़ातील सर्व व्यापारी आणि बाजार समित्यांचे सभापती यांची एकत्रित बैठक लासलगाव बाजार समितीच्या सभागृहात बोलावण्यात आली आहे.

कृषिमाल नियमनमुक्त करण्यासोबत बाजार समितीत होणाऱ्या व्यवहारात अडत खरेदीदाराने द्यावी, असा निर्णय झाल्यापासून त्याचे विविध स्वरूपात पडसाद उमटत आहे. अडतीच्या मुद्दय़ावरून व्यापाऱ्यांनी लिलावावर बहिष्कार टाकत पुकारलेल्या संपामुळे पाच दिवस भाजीपाल्याचे लिलाव बंद राहिले. त्याचा फटका शेतकरी व शहरी भागातील ग्राहकांना सहन करावा लागला. कृषिमालाच्या विक्रीची पर्यायी व्यवस्था नसल्याने शहरी भागात भाजीपाल्याचा तुटवडा झाला. यामुळे सर्वसामान्यांना महागडय़ा दराने तो खरेदी करावा लागला. या स्थितीत भाजीपाल्याच्या विषयावर तोडगा निघाल्याने सर्वाचा जीव भांडय़ात पडला असला तरी ग्रामीण भागातील बाजार समित्यांमधील कांदा, टोमॅटो, बेदाणा व धान्याचे लिलाव बंदच आहेत. नाशिक बाजार समिती वगळता इतरत्र कांद्याचे व्यवहार मोठय़ा प्रमाणात होतात. शुक्रवारी भाजीपाल्याचे व्यवहार पूर्ववत झाले असले तरी आवक कमी होती. भाजीपाला विकला जाईल की नाही याची धास्ती असल्याने असे घडल्याचे सभापती देवीदास पिंगळे यांनी नमूद केले.

या घडामोडी घडत असताना व्यापारी वर्गाने नवीन पवित्रा स्वीकारून शासनावर दबाव आणण्याचे धोरण कायम ठेवले. सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा, टोमॅटो, धान्य, बेदाणा व आदींची खरेदी करणारे जवळपास हजार व्यापारी आहेत. लिलावात सहभागी न झाल्याबद्दल समित्यांनी संबंधितांना परवाने निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. परवाने निलंबित करण्याऐवजी तेच समित्यांना परत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी सांगितले. बाजार समित्यांच्या जोखडातून कृषिमाल नियमनमुक्त झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना समितीत माल खरेदी करावा, असे बंधन राहिलेले नाही. अडत व तत्सम खर्चाचा भार पडल्याने समितीतील खरेदीपेक्षा बाहेरील खरेदी स्वस्तात पडणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी उपरोक्त मालाचे व्यवहार बाजार समितीबाहेर करण्याचे निश्चित केल्याचे भंडारी यांनी नमूद केले.

व्यापाऱ्यांच्या पवित्र्यामुळे बाजार समित्यांच्या संचालक मंडळातही अस्वस्थता पसरली आहे. संबंधितांची शुक्रवारी सकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात तातडीची बैठक पार पडली. बाजार समितीच्या बाहेर खरेदी झाल्यास द्राक्षाच्या खरेदीत जसे प्रकार घडतात, तसे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. समितीमध्ये शेतकऱ्यांना पैसे परत मिळण्याची हमी असते. बाहेरील खरेदीत तसे संरक्षण मिळणार नाही. हा मुद्दा घेऊन बाजार समित्यांचे सभापती पणनमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले. कांदा व इतर तोडगा न निघालेल्या कृषिमालाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी रविवारी दुपारी तीन वाजता जिल्ह्य़ातील सर्व बाजार समित्यांचे सभापती आणि व्यापारी यांची संयुक्त बैठक लासलगाव बाजार समितीत होणार असल्याचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले.

आवक कमी, भाव वधारलेले

भाजीपाल्याचे लिलाव नेहमीप्रमाणे सुरू झाल्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी नाशिकच्या बाजार समितीत आवक मात्र कमी राहिली. यामुळे त्याचे दरही वधारलेले राहिले. टोमॅटो प्रति क्विंटल सरासरी भाव २५०० रुपये, हिरवी मिरची ५८००, लवंगी मिरची ७०००, कोथिंबीर (१०० जुडय़ा) ३६००, मेथी १६००, शेपू ११००, कांदा पात १६००, वांगी ३२५०, फ्लॉवर १६१०, कोबी २७१०, ढोबळी मिरची ५६२५, भोपळा १८५५, कारले ५६२५, गिलके ३७५०, भेंडी ४३७५, काकडी १३७५ असे भाव मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2016 1:09 am

Web Title: onion merchant issue in nashik
Next Stories
1 विठ्ठलाच्या जयघोषाचा सर्वत्र निनाद
2 वसतिगृहातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी
3 शेतकऱ्यांची आडतमुक्ती हेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यश
Just Now!
X