News Flash

कांदा गडगडला

बुधवारी लिलावास सुरुवात झाल्यावर कांद्याचे क्विंटलचे भाव हजार रुपयांच्या खाली घसरले.

मनमाड शहरातील मालेगाव नाका चौफुलीवर आंदोलन करताना शेतकरी.

मनमाड येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको

निर्यात मूल्य कमी होऊनही कांद्याचे भाव हजार रुपयांखाली गेल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद पाडून मालेगाव नाका येथे रास्ता रोको केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आणि राज्य मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला.
बुधवारी लिलावास सुरुवात झाल्यावर कांद्याचे क्विंटलचे भाव हजार रुपयांच्या खाली घसरले. विशेष म्हणजे केंद्र शासनाने दोन दिवसांपूर्वी निर्यात मूल्य दर ७०० वरून ४०० डॉलपर्यंत खाली आणले होते. त्याचा परिणाम कांद्याचे दर काहीसे उंचावण्यात होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. पण घडले उलटेच. कांद्याचे निर्यात मूल्य कमी होऊन सुमारे तीन दिवस उलटूनही अद्याप अपेक्षित भाव मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे.
बुधवारी सकाळी मनमाड कृषी बाजार समितीत ८५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. प्रतिक्विंटल सरासरी भाव ९५० रुपये मिळाला. मागील दोन दिवसांच्या तुलनेत आवक कमी होऊनही क्विंटलमागे ३५० रुपयांनी भाव कमी झाले. कांदा भाव हजार रुपयांच्या खाली घसरल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीत सुरू असलेले लिलाव बंद पाडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या घोषणा देत मोर्चा काढून त्यांनी मालेगाव चौफुलीवर राज्य मार्गावर अचानक रास्ता रोको सुरू केले. मोठय़ा संख्येने शेतकरी त्यात सहभागी झाले. अर्धा तास हे आंदोलन सुरू होते.
पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्वाची समजूत काढली. त्यामुळे संतप्त शेतकरी पुन्हा समितीच्या आवारात दाखल झाले. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार संजय पवार यांनी घटनास्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. कांदा भावाबाबत केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले. निर्यात मूल्य कमी केले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. निर्यात मूल्य शून्य करावे, कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी पवार यांनी केली.
किमान निर्यात मूल्य कमी केल्यानंतरही कांद्याच्या भावात घसरण सुरू असून अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव हजार रुपयांपर्यंत घसरले. अचानक झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2015 3:35 am

Web Title: onion price decrease
टॅग : Onion
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय मिसेस सौंदर्यवती स्पर्धेत नमिता कोहोक विजेत्या
2 लाचखोर मुख्याध्यापक जेरबंद
3 आंदोलनांमुळे वाहतूक विस्कळीत
Just Now!
X