जूनच्या मध्यापर्यंत एक हजार रुपयांच्या आत रेंगाळणारे कांदा दर आता प्रति क्विंटलला १२५१ रुपयांवर पोहोचले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत बुधवारी कांदा दरात १७१ रुपयांनी वाढ झाली. बाजारातील स्थिती पाहून शेतकऱ्यांनी चाळीतील कांदा बाहेर काढण्यास प्राधान्य दिल्याने जिल्ह्य़ातील बाजारांमध्ये आवक वाढल्याचे पाहावयास मिळाले.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कांद्याचे विपुल उत्पादन झाले असल्याने त्याचे दर कसे राहणार याबद्दल शेतकरीवर्गात साशंकता आहे. उन्हाळी कांद्याचे आयुर्मान अधिक असते. तो चाळीत साठवून शेतकरी दर उंचावण्याची प्रतीक्षा करतात. गेल्या वेळी साठवणूक करूनही उत्पादन खर्च भरून निघेल इतपत दर मिळाले नव्हते. यामुळे शेतकरी हळूहळू माल बाजारात आणत आहेत. या हंगामात जूनच्या मध्यानंतर भावाने एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. लासलगाव बाजार समितीत बुधवारी २७ हजार क्विंटलची आवक झाली. त्यास किमान रुपये ५०० ते कमाल १३८३, सरासरी १२५१ दर मिळाले. आदल्या दिवशी हे दर सरासरी १०८० रुपये होते. दरातील उसळण लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी माल बाजारात आणण्यास प्राधान्य दिले. यामुळे आदल्या दिवशीच्या तुलनेत १० हजार क्विंटल कांद्याची अधिक आवक झाली. मनमाड बाजार समितीत सरासरी ११५० रुपये भाव मिळाला. दर उंचावल्याने शेतकरी बाजारात माल आणत आहे. तथापि, यामुळे आवक वाढून घसरणीचा धोका आहे. दर या पातळीवर स्थिर राहतील. यामुळे शेतकऱ्यांनी मालाची टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असे आवाहन लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केले.