आवक वाढल्यानंतरच चित्र बदलाची शक्यता

गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस कांद्याचा भाव होता, प्रति क्विंटलला सरासरी ६५० रुपये. पुढे वर्षभरात चार आकडी दर कधीतरी मिळाले. मात्र, ते फार काळ तग धरू शकले नाहीत. या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस गतवर्षीच्या तुलनेत भाव चार ते पाच पटीने उंचावला आहे. नवीन लाल कांदा बाजारात येण्यास झालेला विलंब आणि संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेला उन्हाळ कांदा यामुळे पावणेदोन वर्षांत प्रथमच घाऊक बाजारात दराने उच्चांकी पातळी गाठली. त्यात काही अंशी चढ-उतार होईल; परंतु मुबलक प्रमाणात नवीन कांदा येईपर्यंत किमान महिनाभर भाव या पातळीवर राहण्याची चिन्हे आहेत.

दिवाळी सुटीनंतर उघडलेल्या जिल्ह्य़ातील बाजार समित्यांमध्ये प्रति क्विंटलला २९०० रुपयांपर्यंत उसळी घेणारा कांदा दुसऱ्या दिवशी अडीच हजार रुपयांपर्यंत खाली आला. शहरी भागातील किरकोळ बाजारात किलोचे भाव ५० ते ६० रुपयांना जाऊन भिडले. पुढील एक ते दीड महिना कांदा ग्राहकांना रडवणार असल्याची स्थिती आहे. परतीच्या पावसाने कर्नाटकसह महाराष्ट्रातील काही भागात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात घट होईल. मागणी वाढत असताना पुरवठा कमी आहे. दुसरीकडे उंचावलेल्या भावाचा शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नाही. त्याचे कारण हंगामात सर्वाधिक भावाने आपला कांदा विक्री करणारे चांदवडच्या काजी सांगवीचे दगुजी ठाकरे सांगतात. एप्रिल-मेपासून त्यांनी उन्हाळ कांद्याची चाळीत साठवणूक केली होती. हवेतील आद्र्रता वाढल्याने निम्मा कांदा खराब झाला. यामुळे उर्वरित मालाची विक्री करता आली. त्याला जो भाव मिळाला तो निसर्गामुळे. पावसामुळे नवीन कांदा बाजारात येण्यास उशीर झाला. एरवी ऑक्टोबरच्या मध्यापासून लाल कांद्याची मोठय़ा प्रमाणात आवक सुरू होते. ती न झाल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आणि उन्हाळ कांद्याला अखेरच्या टप्प्यात हे दर मिळाले. खराब झालेल्या निम्म्या मालाचे नुकसान पाहिल्यास विकलेल्या मालातून फायदा होणार नसल्याचे ठाकरे सांगतात. बाजारात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांची कमी-अधिक प्रमाणात ही अवस्था आहे.

कोणाचा साठविलेला उन्हाळ कांदा खराब झाला तर कोणाच्या हातातोंडाशी आलेल्या पिकावर पाणी फेरले गेले. राज्यात वर्षभरात खरीप (लाल), लेट खरीप (रांगडा) आणि उन्हाळ हे कांदे पिकविले जातात. उन्हाळ कांद्याचे आयुर्मान अधिक असते. त्यामुळे त्याची साठवणूक केली जाते.

एप्रिलपासून सुरू होणारा कांदा ऑक्टोबपर्यंत बाजाराची गरज भागवितो. लाल कांदा ऑक्टोबरपासून तर लेट खरीप अर्थात नावाप्रमाणे रांगडा असणारा कांदा डिसेंबरच्या अखेरीस बाजारात दाखल होतो. यंदा लाल व रांगडा कांद्यास विलंब होणार आहे. साठविलेला उन्हाळ कांदा संपुष्टात येत आहे. या स्थितीत एक ते दीड महिना टंचाई निर्माण होऊन दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

दरावर नियंत्रण मिळवणे अवघड

महानगरांमध्ये स्वस्त कांदा देण्यासाठी मागील काही महिन्यांपासून केंद्र सरकार घाऊक बाजारात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे. मध्यंतरी बडय़ा कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकले गेले. त्यातून काय निष्पन्न झाले? नंतर बाजार समिती व व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री होणाऱ्या मालाची दैनंदिन माहिती जिल्हा प्रशासनाला देणे बंधनकारक करण्यात आले. या कारवाईने भाव कोसळले. पण ते तात्कालिक परिणाम होते. सद्य:स्थिती लक्षात घेतल्यास सरकारने कितीही प्रयत्न केले तरी भाव नियंत्रित होणार नाही. कर्नाटकसह अन्य राज्यांत पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रातही वेगळी स्थिती नाही. यामुळे नवीन कांद्याच्या उत्पादनात घट होईल. माल कमी आणि मागणी अधिक यामुळे महिनाभर भाव कमी होण्याची शक्यता नाही. नवीन कांद्याची आवक वाढल्यानंतर हे चित्र काही अंशी बदलू शकते. – चांगदेवराव होळकर (माजी उपाध्यक्ष, नाफेड)

केंद्र सरकारतर्फे कांदा खरेदीची तयारी

केंद्र सरकार बाजार समितीतून कांदा खरेदी करण्याच्या विचारात आहे. गेल्या महिन्यांत भाव अडीच हजार रुपयांवर गेल्यावर तशी तयारी झाली होती; परंतु नंतर भाव उतरल्याने खरेदी झाली नाही. पावसाने कांदा पिकाचे नुकसान केले. रोपे उशिरा तयार झाली. एरवी १५ ऑक्टोबरपासून नवीन लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात होते; परंतु यंदा त्यास विलंब होणार आहे. मुबलक प्रमाणात नवीन कांदा बाजारात आल्यावर भाव कमी होतील. त्यासाठी एक ते दीड महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. – नानासाहेब पाटील (संचालक, नाफेड)