नाशिक : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर उघडलेल्या जिल्ह्य़ातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात २५० ते ३०० रुपयांनी घसरण झाली. लासलगावसह अन्य बाजार समित्यांमध्ये ही स्थिती होती. काही महिन्यांपासून कांद्याचे दर कमालीचे घसरले होते. त्यात काहीशी वाढ होण्याची चिन्हे दिसत असताना भावात घसरण झाल्यामुळे उत्पादक अस्वस्थ झाले आहेत.

मनमाड बाजार समितीत गुरुवारी सरासरी १५०० रुपये क्विंटल असे कांद्याचे भाव होते. त्यानंतर तीन दिवस बाजार समितीला सुट्टी होती. सोमवारी सकाळी बाजार आवारात ३७७ नग इतकी कांद्याची आवक झाली. उन्हाळ कांद्याला ४०० ते १४१५, सरासरी १२५० रुपये भाव मिळाला. आकाराने लहान असणाऱ्या उन्हाळ कांद्याचे (गोल्टी) ६५१ ते ११०१, सरासरी १०५० रुपये भाव होते. टाळेबंदी लागू झाल्यापासून कांद्याची मागणी लक्षणीय घटली आहे. यामुळे भावही गडगडले. अनेक महिने ही स्थिती बदलली नव्हती. दरम्यानच्या काळात निर्यातबंदी मागे घेऊनही दरात फारसा फरक पडलेला नव्हता. हॉटेल वा तत्सम खाद्यगृहे बंद असल्याने मागणी नव्हती. त्यात उन्हाळ कांद्याचे विपुल उत्पादन झाले आहे. देशातील अन्य भागांतून मोठय़ा प्रमाणात कांदा असल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी कमी झाली होती.

अलीकडेच कर्नाटकसह काही भागांत पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्यामुळे नाशिकच्या कांद्याची मागणी वाढली. यामुळे मागील काही दिवसांत भाव वधारत असताना त्यास पुन्हा खीळ बसली आहे. लासलगाव बाजारात या दिवशी १३ हजार क्विंटलची आवक झाली. त्यास सरासरी १२०० रुपये भाव मिळाला. तीन दिवसांपूर्वी १५ हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन त्यास सरासरी १४८० रुपये दर मिळाले होते. तीन दिवसांत दरात २८० रुपयांची घसरण झाली. मागील आठवडय़ात हंगामात सर्वाधिक १६७० रुपये दर मिळाले होते. त्याचा विचार केल्यास आठवडाभरात भाव ५०० रुपयांनी कमी झाले आहेत.