News Flash

कांदा स्वस्त, व्यापारी मस्त!

कांदा रडवे शेतकऱ्यांना

( संग्रहीत छायाचित्र )

शेतकऱ्यांकडून ४ रूपयांनी खरेदी केलेल्या कांद्याची बाजारकिंमत चारपटींत

जिल्ह्य़ातील घाऊक बाजारात सरासरी साडे चार रुपये किलो दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणारा उन्हाळ कांदा ग्राहकांच्या हाती नाशिकमध्ये दहा ते बारा तर मुंबईत १५ ते १८ रुपये दराने पडत आहे. काही महिने शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला नुकसानीत कांदा विकावा लागत असताना दुसरीकडे शेतकरी ते ग्राहक यांच्यातील व्यापाऱ्यांची साखळी मात्र अल्पावधीत दुप्पट वा तिपटीने नफा कमावित आहे. राज्य शासनाने गतवर्षी घेतलेल्या कृषिमाल नियमन मुक्तीच्या निर्णयाचा फारसा लाभ झाला नाही. उलट कांदा नियमन मुक्त झाल्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना फसविण्याचे प्रकार वाढल्याची तक्रार बाजार समितीचे पदाधिकारी करतात.

इतरांच्या तुलनेत अधिक आर्युमान असणारे उन्हाळ कांदा या हंगामातही शेतकऱ्यांना रडवत आहे. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानने (एनएचआरडीएफ) कांद्याचा प्रति क्विंटलला साधारणत: ९०० रुपये उत्पादन खर्च निश्चित केला आहे. म्हणजे या दरात अथवा त्याहून अधिक दराने त्याची विक्री झाल्यास उत्पादकास दोन पैसे मिळू शकतात. मागील

दोन महिन्यांपासून उन्हाळ कांद्याची आवक होत आहे. या काळात एकदाही त्याला किमान उत्पादन खर्चाइतका भाव मिळालेला नाही. या काळात प्रति क्विंटलचे (१०० किलो) दर ३५० ते ५०० रुपये सरासरीच्या दरम्यान राहिले. घाऊक बाजारात सरासरी भाव काही कांद्याला मिळतो. बहुतेकांना कांदा २०० ते ३०० रुपये या किमान दरात विक्री करावा लागतो. त्यातही धनादेशाद्वारे (रोकडरहित) होणाऱ्या व्यवहारांमुळे विकलेल्या मालाच्या पैशांसाठी व्यापारी कित्येक दिवस तिष्ठत ठेवतात, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. चांदवडच्या ऊसवाडचे शेतकरी बाळू आहेर यांनी मागील आठवडय़ात ३०० रुपये आणि आकाराने लहान कांदा अवघ्या १०० रुपये क्विंटल या दराने विकला. चांगला भाव येईपर्यंत कोणी प्रतिक्षा करण्यास तयार नाही. गतवर्षी साठवणूक करणाऱ्यांचे हात पोळले गेले होते. सद्यस्थितीत पावसाला कधीही सुरूवात होईल. साठवण्याची व्यवस्था नाही आणि साठवणूक करूनही उपयोग होत नाही. त्यामुळे बहुतेकांना कांदा बाजारात नेण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे आहेर यांनी सांगितले.

कांदा रडवे शेतकऱ्यांना

घाऊक बाजारात दोन ते चार रुपये किलोने खरेदी केला जाणारा कांदा ग्राहकांना मात्र महागात मिळतो. बाजार समित्यांपासून अवघ्या ४० ते ५० किलोमीटर अंतरावर नाशिक शहरातील किरकोळ बाजारात त्याचे दर १० ते १२ रुपये किलो आहेत. मुंबईत त्याचा भाव कोणत्या परिसरात विक्री होणार यावर निश्चित होतो. काही भागात १५ तर काही ठिकाणी २० रुपये किलोने त्याची विक्री होत असल्याचे ग्राहक सांगतात. कांदा बाजार गडगडले असताना देखील व्यापाऱ्यांची चांदी होत आहे. लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी देखील ही बाब मान्य केली. शेतकरी-ग्राहक यांच्यात व्यापारी वर्गाची बरीच मोठी साखळी आहे. प्रत्येक घटक आपला नफा समाविष्ट करत पुढे माल विक्री करतो. यामुळे शेतकऱ्यास मिळणारा दर आणि ग्राहकाचा खरेदी दर यात मोठी तफावत आहे. नफा मिळणार नसल्यास व्यापारी काही दिवस व्यापार करणार नाही, अशी पुष्टीही होळकर यांनी जोडली. बाजार नियमनमुक्तीमुळे बाजार समितीबाहेर होणाऱ्या कृषिमाल व्यवहारांवर कोणाचेही नियंत्रण नाही. यामुळे सटाणा तालुक्यात बाहेरील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची कोटय़वधींची फसवणूक केली. कांदा व्यवहारात इतिहासात असे फसवणुकीचे प्रकार घडले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

घाऊक व किरकोळ बाजारातील किंमती लक्षात घेतल्यास शेतकऱ्याला काहीच लाभ पदरात पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शहरात येऊन थेट ग्राहकांना माल विक्री करण्याची आवश्यकता आहे. यामुळे त्यांना मालाची चांगली किंमत मिळेल आणि ग्राहकांना किफायतशीर दरात ताजा माल मिळू शकेल. त्यासाठी गावातील तीन ते चार शेतकरी एकत्रित येऊन ही व्यवस्था करू शकतात.  – अनुराधा रायकर (गृहिणी)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 1:10 am

Web Title: onion prices fall marathi articles
Next Stories
1 मनमाड रेल्वे आरक्षण कार्यालयात फिल्मी स्टाइल चोरी
2 नाशिकमधील कॉलेज रोडवरील ‘स्पा’मध्ये अनैतिक व्यवसाय, १३ जण ताब्यात
3 ‘स्मार्ट नाशिक’साठी डुक्करे हद्दपार
Just Now!
X