नाशिक : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम कांदा आवक घटण्यात झाला असून त्याची परिणती भावाने आजवरचा उच्चांक गाठण्यात झाली. गुरूवारी प्रति क्विंटल साडेसहा हजार रूपये असा टप्पा गाठत आजवरचा उच्चांक गाठला. १९४७ मध्ये स्थापन झालेल्या लासलगाव बाजार समितीत आजवर मिळालेला हा सर्वाधिक भाव आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये उन्हाळ कांद्याला ६३२६ रुपये भाव मिळाला होता.

देशांतर्गत मागणी वाढत असताना जिल्ह्य़ातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची फारशी आवक नसल्याने भावाने नवी उंची गाठली. लेट खरीपचा कांदा येईपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. कांद्याची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजारात गुरूवारी ५४२ क्विंटल उन्हाळ तर नव्या कांद्याची ५२० क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांद्याला किमान २५०१ ते कमाल सात हजार आणि सरासरी ६४५१ रुपये भाव मिळाला. नव्या लाल कांद्याला १८०१-६००१ आणि सरासरी साडेपाच हजार रुपये भाव मिळाला. बाजार समिती स्थापन झाल्यापासून आजतागायत उन्हाळ कांद्याला मिळालेला सर्वाधिक भाव ६३२६ रुपये इतका आहे. सरासरी भावाने आजवर साडेसहा हजाराचा पल्ला गाठला नव्हता. आवक घसरल्याने भावाने ही उंची गाठल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. जिल्ह्य़ातील इतर बाजार समित्यांमध्ये ही स्थिती होती. मनमाड बाजार समितीत उन्हाळ कांद्याची ६० क्विंटल आवक झाली. त्यास सरासरी सहा हजार क्विंटल भाव मिळाला. नव्या लाल कांद्याची ३०० क्विंटलची आवक झाली. त्यास सरासरी चार हजार रुपये भाव मिळाले. अवकाळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. आवक घटण्यामागे ते कारण असून लेट खरीप कांदा येईपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचे चित्र आहे.